Breaking-newsआंतरराष्ट्रीय

मलेशियाच्या पंतप्रधानपदी वयोवृद्ध महाथीर मोहम्मद

कुआलालांपूर, (मलेशिया) – मलेशियाच्या पंतप्रधानपदी 92 वर्षीय महाथीर मोहमद यांची निवड झाली आहे. निवडणूकीमध्ये मलेशियामधील सहा दशकांपासूनची बारिसान नॅशनल आघाडीची राजवट संपुष्टात आणून महाथीर यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मलेशिया 1957 मध्ये स्वतंत्र झाल्यापासून या आघाडीने मलेशियावर एकछत्री सत्ता गाजवली होती. निवडणूक प्रक्रियेतून एखाद्या देशाचे प्रमुख नेतेपद मिळवणारे ते सर्वात वयोवृद्ध नेते बनले आहेत.

महाथीर यांनी यापूर्वी 22 वर्षे मलेशियावर एकहाती राज्य केले होते. निवृत्तीनंतर बराच काळ ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र पंतप्रधान नजीब रझाक यांच्याविरोधातल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे ते विजनवासातून बाहेर आले आणि निवडणूक लढवून देशाचे पंतप्रधान बनले आहेत.

राजधानी कुआलांपूरमधील राजप्रासादामध्ये झालेल्या शपथविधीच्या समारंभामध्ये महाथीर यांनी राजे सुलतान मुहम्माद पाचवे यांच्याकडून पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी पारंपारिक मलाय पोषाख परिधान केला होता. यावरूनच त्यांचा कल परंपरावादी असल्याचे स्पष्ट होते. या शपथविधीनंतर संपूर्ण कुआलालांपूर शहरामध्ये फटाक्‍यांची आतषबाजी आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

निवडणूकीत पराभव निश्‍चित दिसू लागल्यावर नजीब हे बराच काळ गायब झाले होते. गुरुवारी ते माध्यमांसमोर आले आणि आपण पराभव स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. तुरुंगात असलेले विरोधी नेते अन्वर इब्राहिम यांचे आणि महाथीर यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. नजीब यांनी अन्वर यांना पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून तुरुंगात टाकले. महाथीर यांनी अन्वर यांची शिक्षा माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group