स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये तांत्रिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रात सहकार्य करणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/33f58a035f9b9fe2b26ad06eb9997a99_XL.jpg)
पिंपरी – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये तांत्रिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी फ्रान्स तयार आहे, असे मत फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झीग्लर यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मंगळवारी (दि.10) महापालिका व फ्रान्सचे औद्योगिक शिष्टमंडळ यांच्यातील द्विपक्षीय चर्चे दरम्यान ते बोलत होते. फ्रान्सच्या या शिष्टमंडळामध्ये सल्लागार मंत्री व भारत आणि दक्षिण आशिया प्रादेशिक आर्थिक विभागाचे प्रमुख फ्रान्सचे दूत जीन-मार्क फेनेट, येवेस पेरीन, हर्व डूबृएल, इलिका मान, फॅनी हर्व, क्लेमेंट रॉऊशोउस, जीन मार्क मिग्नोन, सांड्रायन मॅक्समिलीएन, अमित ओझा, क्रिस्तोफर कॉम्मेऊ, एडगर ब्राउल्ट, रविन मिरचंदानी यांच्यासह 35 जणांचा समावेश होता
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे संचालक व विरोधी पक्षेनेते दत्तात्रय साने, मनसे गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे आदी उपस्थित होते.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासाठी फ्रान्सने सहकार्य करावे. तसेच विविध औद्योगिक कंपन्यांनी देखील आपले तंत्रज्ञान स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आयसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंट व विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.
या शिष्टमंडळास ‘ई अँड वाय’ या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी नितीन जैन यांनी पॅन सिटीबाबत विस्तृत सादरीकरण केले. केपीएमजी या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी राजा डॉन यांनी एरिया बेस डेव्हलपमेंटचे सादरीकरण केले. तसेच पॅलेडीयम इंडियाच्या श्रीमती बारबरा स्टॅंकोविकोवा यांनी सिटी ट्रान्सफॉर्मेशनबाबत शिष्टमंडळास सादरीकरण केले.