breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘स्पर्श’ हॉस्पिटलवर त्वरित कारवाई करा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल; पोलीस आयुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र!

पिंपरी |

बेडसाठी एक लाख रुपये, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार आदी कारणांमुळे बदनाम झालेल्या ऑटो क्‍लस्टर येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श संस्थेवर त्वरीत कारवाई करा, असे लेखी पत्र पिंपरी चिंचवचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पाठविले आहे. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार पुराव्यासह तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याने लोक संतापले आहेत. स्पर्श कोविड सेंटरमध्ये बेडसाठी चार रुग्णांकडून पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणातील अटक केलेल्या चार डॉक्‍टरांकडून तीन लाख 70 हजारांची रोकड हस्तगत केली आहे. स्पर्श या संस्थेने गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार केल्याचे दिसून आल्याने या संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल, असा गंभीर इशाराच पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्‍तांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे. असंख्य तक्रारी येऊनसुध्दा महापालिका आयुक्त कोणतीही कारवाई करत नसल्याने आता त्यांच्या भूमिकेबद्दलच अनेक नगरसेवक संशय व्यक्त करत आहेत. जनक्षोभ झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्पर्शवर कारवाईची मागणी केली होती. स्पर्श कोविड सेंटरमध्ये रुग्णांची कशी लूट होते, कोणीच डॉक्टर लक्ष देत नाहीत, हे कोविड सेंटर म्हणजे मृत्युचा सापळा आहे, अशा शब्दांत पुराव्यांसह नगरसेवकांनी आपल्या भावना मांडल्या होत्या. आयुक्तांनी आश्‍वासन दिल्यानंतरही अद्यापपर्यंत कारवाई केलेली नाही. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पैसे स्विकारल्याप्रकरणी आतापर्यंत डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे, डॉ. सचिन कसबे या तिघांसह एका महिला डॉक्‍टरला अटक केली आहे. या चौघांकडून ३ लाख ७० हजार रुपये जप्त करण्यात आली असून हे चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यानंतर ऑटो क्‍लस्टर येथील एका कर्मचाऱ्याला दोन मध्यस्थांमार्फत दोन रेमडेसीवीर काळ्या बाजारात ८० हजारांना विकताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने हे प्रकरण सध्या गंभीर वळणावर पोहोचले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना लेखी पत्र पाठवित स्पर्शवर तात्काळ कारवाई करण्याची सूचना करत कायदा व सुव्यस्थे संदर्भात गर्भित इशारा दिला आहे.

  • काय म्हटले आह पोलिस आयुक्तांनी पत्रात…

स्पर्श प्रायव्हेट लिमीटेडचे कन्सलटंट म्हणून डॉ. प्रवीण जाधव कार्यरत आहेत. आरोपी जाधव यांनी त्याच्या या गुन्ह्यातील सहआरोपी डॉ. सचिन श्रीरंग कसबे आणि डॉ. शशांक राळे यांच्याशी संगनमत करुन महापालिकेच्या कोवीड हॉस्पीटलमध्ये बेड उपलब्ध करणे व इतर वैद्यकीय सेवा मिळवून देण्याच्या नावाखाली गरजू रुग्णांकडून मोठया प्रमाणात पैसे घेण्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. तसेच आणखीन काही रूग्णांची फसवणूक व पिळवणूक झाली असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मागील वर्षी कोरोना साथीचे दरम्यान “स्पर्श’द्वारे भोसरी येथे रामस्मृती मंगल कार्यालय व हिरा लॉन्स या दोन ठिकाणी कोवीड केअर सेंटर चालविले जात होते.

सदर ठिकाणी रूग्णांवर उपचार न करताच पाच कोटी 26 लाख रुपयांचे खोटे बिल सादर केल्याबाबत महापालिकेमध्ये आयएएस दर्जाचे अधिकाऱ्यांचे मार्फत चौकशी सुरू आहे. ऑटो क्‍लस्टर पिंपरी येथील हॉस्पीटलचे व्यवस्थापन देखील स्पर्श संस्थाच करत आहे. सध्याच्या दाखल गुन्ह्यामधील उघडकीस आलेला भ्रष्टाचार व गैरव्यवहार लक्षात घेता या महामारीच्या काळामध्ये लोकांची अशीच पिळवणूक होत राहिली तर भविष्यात जनतेमध्ये असंतोष निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑटो क्‍लस्टर येथे कोविड हॉस्पीटल चालविणाऱ्या स्पर्श या संस्थेवर योग्य ती कारवाई होणेस विनंती आहे.

वाचा- पाबळ ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारणार; आमदार महेश लांडगे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button