Mumbai Pune Expressway | पुणे मार्गिकेवर पहाटेपासून ट्राफिक जॅम!
टाटा कॅम्प ते अमृतांजन पुलापर्यंत वाहनांच्या रांगा

लोणावळा | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी पहाटेपासून पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी झालीय. बोरघाट परिसरात आज पहाटेपासून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे एक्सप्रेवेवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सकाळपासून पुण्याच्या दिशेने टाटा कॅम्प ते अमृतांजन पॉईंट पुढे सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने बोरघाट वाहतूक पोलिसांकडून ‘ब्लॉक’ घेण्यात येत आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक खंडाळा बोगदा येथे तर पुण्याकडे येणारी वाहतूक खोपोली हद्दीत बोरघाट पोलिस मदत केंद्राजवळ नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक थांबवून साचलेला बॅकलॉग टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत आहे. मात्र तोपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.
पुण्याकडे येणाऱ्या ट्रक व कंटेनर आदी अवजड वाहनांची संख्या जास्त असल्याने घाट मार्गावर काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांच्या देण्यात आली.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांना आता रोज पाणी!
तीन ब्लॉक तरीही कोंडी…
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दुपारी साडे बारा वाजेपर्यंत तीन वेळा ब्लॉक घेण्यात आला. मात्र तरीही पुण्याच्या दिशेनं वाहतूक कोंडी निर्माण झालीय. तर मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक सुरळीत आहे. शिवजयंती सुट्टी आणि त्यानंतर असलेला लाँग विकेंड यामुळे वाहनांची संख्या वाढलीय.
प्रवशांमधून संताप…
ब्लॉक घेताना १५ मिनिटांसाठी वाहतूक थांबवली जाते आणि कोंडी झालेल्या मार्गावरील वाहने वळवण्यात येतात. मात्र अद्यापही पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. २ ते ३ किमी पेक्षा जास्त लांब वाहनांच्या रांगा लागल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.




