देवगड आंब्यावर टँपर प्रूफ युआयडी

पुणे : देवगड आंब्यांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून देवगड तालूका आंबा उत्पादत संघाने हापूस आंब्यांवर टँपर प्रूफ युआयडी सीलची सक्ती यावर्षीपासून सक्ती केली आहे. त्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली बाजारात ग्राहकांची होणारी फसवणूक थांबेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या आंब्याचा योग्य भाव मिळेल, असा दावा या संघाने केला आहे.
या नव्या निर्णयानुसार प्रत्येक हापूस आंब्यावर युआयडी क्रमांक असलेला स्टिकर लावण्यात येईल. पुढे ग्राहकाने या स्टिकरचा फोटो स्टिकरवर दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवला असता त्या स्टिकरपाहून हा आंबा खरच देवगड हापूस आहे की नाही, हे स्पष्ट होईल. त्यासाठी या स्टिकरवर एक विशेष क्रमांक दिला असून तो तपासल्यानंतर स्टिकरच्या मागे लिहिलेला अजून एक क्रमांक ग्राहकाला व्हाट्सॲप टाकावा लागणार आहे.
हेही वाचा – आंद्रा धरणावर जलउपसा केंद्रासाठी जागेची प्रतीक्षा!
हे दोन्ही क्रमांक जुळले तर तो आंबा देवगडचा आंबा आहे, हे स्पष्ट होईल. उत्पादक संघाचे अध्यक्ष ओंकार सप्रे यांनी सांगतले की, देवगडच्या हापूस आंब्याला जीआयचा टॅग आहे. त्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली इतर कोणता आंबा विकणे एक गुन्हा आहे. तरी व्यापारी, दलाल आणि किरकोळ विक्रेत्यांनी अशा बनावट हापूस आंब्यांची विक्री करू नये आणि युआयडी असलेल्या आंब्यांचीच देवगड हापूस म्हणून विक्री करावी.