पुणेकरांनो अडगळ दूर करा! महापालिकेकडून निरुपयोगी वस्तू संकलन अभियान

पुणे : सण-उत्सवांच्या कालावधीत, विशेषतः दिवाळीत, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात घरातील जुन्या वस्तू व फर्निचर बदलले जाते. मात्र, हे साहित्य अनेकदा गुपचूपपणे नदीपात्र, रस्त्याच्या कडेला टाकले जाते किंवा घरातच अडगळीत साठवले जाते. नंतर ते कुजल्यावर कचऱ्यात फेकले जाते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून येत्या ११ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महाअभियान राबविण्यात येणार आहे.
सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत प्रत्येक प्रभागात चिंध्या, उश्या, गाद्या, फर्निचर तसेच सणसमारंभाच्या अनुषंगाने घराघरातून निघणारे साहित्य — जसे की देवी-देवतांचे फोटो व पूजासाहित्य, ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलित करण्यात येणार आहे.
हेही वाचा – राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर
पेहेल उपक्रमांतर्गत जनवाणी, कमिन्स इंडिया फाउंडेशन, के.पी.आय.टी. टेक्नॉलॉजी आणि आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह या संस्थाही या मोहिमेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून १२ ऑक्टोबर रोजी ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“शहरात सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात नवीन फर्निचर तसेच घरगुती साहित्य खरेदी केले जाते. त्यानंतर जुने साहित्य वापरातून काढले जाते. अनेकदा हे साहित्य रस्त्याच्या कडेला फेकले जाते किंवा अडगळीत ठेवले जाते. त्यात प्रामुख्याने कपडे, गाद्या, उशा आणि तुटलेले फर्निचर यांचा समावेश असतो. हे साहित्य नंतर कुजल्यामुळे किंवा उचलले न गेल्यास नाल्यात तसेच पावसाळी चेंबरमध्ये अडकते आणि विविध समस्या निर्माण होतात. तसेच नागरिकांकडे हे देण्यासाठी योग्य व्यवस्था नसते. त्यामुळेच महापालिकेकडून ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.”
– संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग.





