पुणे विमानतळाच्या ‘कनेक्टिव्हिटी’ला गती मिळणार
खडकवासला-खराडी मेट्रो, 4 मार्गिका विमानतळाला जोडण्याचे विचारधीन

पुणे | शहराच्या कोणत्याही भागातून पुणे विमानतळावर येणे सुलभ व्हावे या दृष्टीने विमानतळाची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यात येणार आहे. त्यानुसार खडकवासला ते खराडी ही मेट्रो मार्गिका विमानतळाला जोडण्याचे विचाराधीन आहे. त्याबाबतचे नियोजन सुरू झाले असून, मेट्रो मार्गिकांचा विस्तार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) करण्यासाठी महापालिकांनी निधी द्यावा आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने डीपीआर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ सल्लागार समितीची (एएसी) बैठक झाली. तीन वर्षांनंतर होत असलेल्या या बैठकीत विमानतळाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर मोहोळ यांनी त्याबाबतची माहिती दिली. पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह व्यापार, उद्योग, पर्यटन आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या पाच वर्षात एक कोटींवर
पुण्यातील सध्याच्या चार मेट्रो मार्गिका थेट पुणे विमानतळाशी जोडण्यात येणार आहेत. खडकवासला ते खराडी ही मेट्रो मार्गिकाही विमानतळाला जोडण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांबरोबर चर्चा झाली असून, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका महापालिकांच्या अखत्यारित येत असल्याने त्यांनी विमानतळापर्यंतच्या विस्तारित मार्गिंकाचा डीपीआरसाठी निधी द्यावा आणि महामेट्रोने डीपीआर करावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
येत्या ५० ते १०० वर्षांचा विचार करून पुणे विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी २०० एकर जागेची आवश्यकता असून, त्यातील २५ एकर जागा संरक्षण विभागाकडून घेण्यात येणार आहे. त्याबदल्यात संरक्षण विभागाला दुसरीकडे जागा दिली जाणार आहे. तर, ६५ एकर खासगी जागेचेही हस्तांतरण करण्यात येणार असून उर्वरित जागेसाठीही चर्चा सुरू झाल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी ‘ओएलएस’ सर्वे झाला असून, सर्व विभागांसमवेत बैठका सुरू आहेत. भूसंपादनाचे काम राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. विमानतळालगतच्या रस्त्याला पर्यायी रस्ता करावा लागणार असून, पुणे महापालिका त्यासाठी ६५ कोटींचा खर्च करणार आहे. कार्गोसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
कोटपुण्यातून दररोज २०० विमानांची ये-जा होत असून ५२ हजार चौरस मीटर क्षेत्रावर नवीन टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. जुन्या टर्मिनलचाही पुनर्विकास करण्यात येणार असून, नव्याने काही ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. धावपट्टी विस्तारासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री.