कॉरिडॉरला विरोध अन् फडणवीस पंढरीत; संतवाणीचा दाखला देत पोस्टरबाजी

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्टबाबत पंढरपुरात अनोखी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत नामदेव महाराज यांच्या 675 वा संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरात येत आहे. फडणवीसांच्या दौऱ्या निमित्ताने स्वागताच्या अनोख्या पोस्टरबाजीची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉरची निर्मिती करणे. हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याच ड्रीम प्रोजेक्टमध्ये 600 पंढरपुरातील घरांचे भूसंपादन प्रस्तावित असल्याने नागरिकांनी भूसंपादनांना विरोध दर्शवला आहे. मात्र तरीही 25 जुलैपासून पंढरपुरात शासन भूसंपादनाबाबत नागरिकांशी चर्चा करणार आहे.
याप्रकरणी विरोध म्हणून करण्यात आलेल्या पोस्टरबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये संताच्या अभंगाचे दाखले थेट फडणवीसांना उद्देशून देण्यात आले आहेत. संत नामदेव महाराज यांच्या “वतन आमची मिराशी पंढरी… विठोबाचे घरी नांदणूक” या अभंगाच्या ओव्यांचा वापर करून फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले आहे.
हेही वाचा – सर्वसामान्यांना स्वस्त घरांची लॉटरी, राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
आमचे वतन पंढरपूर आहे. आम्ही विठोबाच्या घरी नांदतो. अशा नामदेव महाराजांच्या अभंगाचा दाखला देऊन ‘देवेंद्रजी आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही पंढरपूरची मूळ रचना आणि संस्कृती कायम ठेवाल’ अशा आशयाचा मजकूर या पोस्टवर दर्शवण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून लावण्यात आलेले हे पोस्टर सध्या चर्चा विषय ठरत आहे.
दरम्यान, पंढरपूरचा विकास धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून व्हावा. त्यातून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हजारो कोटी रुपये खर्च करणार आहे.
हा कॉरिडॉर चौफळा ते महाद्वारपर्यंत तयार केला जाणार आहे. यात सुमारे 630 मालमत्ताधारक बाधित होणार आहेत. बाधित लोकांना योग्यप्रकारे आर्थिक मोबदला देण्यासाठी एक पॅकेज देखील तयार केले आहे. काहींनी आपला विरोध कायम असल्याचे सांगितले आहे





