तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याबाबत शासन आदेश जारी; दळणवळण होणार सुकर

तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.मा. ५४८डी) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा प्रकल्पाबाबत शासनाच्या वतीने अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. हा निर्णय यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र आता या संदर्भातील अधिकृत शासन आदेशामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस औपचारिक सुरूवात होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत तळेगाव ते चाकण दरम्यान चार पदरी उन्नत रस्ता व जमिनीवर चार पदरी रस्ता, तर चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनीवर सहा पदरी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. एकूण सुमारे ५३.२ किमी लांबीच्या या मार्गासाठी शासनाने ३९२३.८९ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ३० वर्षांच्या सवलत धोरणांतर्गत राबविण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन, पथकर वसुली आणि देखभाल व्यवस्थापनाची जबाबदारी देखील एमएसआयडीसी कडेच असणार आहे.
हेही वाचा – रोजगार हमी योजनेतील कामांना मिळणार गती
“या मार्गामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि पुणे-संभाजीनगर महामार्ग यांच्यातील महत्त्वपूर्ण दळणवळण सुकर होणार आहे. औद्योगिक दृष्टिकोनातून पाहता, चाकण-तळेगाव पट्ट्याला अधिक गती मिळेल. हा निर्णय म्हणजे संपूर्ण परिसराच्या विकासाची ग्वाहीच आहे,” असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. हा रस्ता परिसरातील नागरी आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरणार असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.