महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम निकाल जाहीर; विविध गटांत मल्लांचा दबदबा
माती व गादी विभागातील अंतिम निकाल जाहीर; विविध वजनगटांत रंगल्या दमदार लढती

पुणे | रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित ६८ वी वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा – २०२६ उत्साहात पार पडली असून माती आणि गादी या दोन्ही विभागांतील अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. राज्यभरातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत विविध वजनगटांमध्ये अतिशय चुरशीच्या आणि दर्जेदार लढती पाहायला मिळाल्या. अखेर उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अनेक मल्लांनी आपल्या गटात विजेतेपद पटकावत प्रेक्षकांची दाद मिळवली.
माती विभागात ५७ किलो वजनगटात कोल्हापूर जिल्ह्याच्या मृणाल पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पुणे शहराच्या ओंकार निगडे यांनी द्वितीय स्थान मिळवले. कोल्हापूर शहराच्या सुदर्शन पाटील यांनी तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. ६१ किलो गटात पुणे जिल्ह्याच्या अमोल वालगुडे यांनी विजेतेपद पटकावले. कोल्हापूर जिल्हा अच्या अजय कापडे यांनी द्वितीय, तर साताऱ्याच्या गोरख कोळेकर यांनी तृतीय स्थान मिळवले.
७९ किलो गटात सोलापूर जिल्ह्याच्या बिरुदेव बनसोडे यांनी प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. बीडच्या अविनाश शिंदे यांनी द्वितीय, तर सोलापूर जिल्ह्याच्या प्रणव हांडे यांनी तृतीय स्थान मिळवले. ८६ किलो गटात सोलापूर जिल्हा बच्या मशीद शेख यांनी प्रथम क्रमांकावर नाव कोरले. पुणे शहराच्या चंद्रहार नरळे यांनी द्वितीय स्थान मिळवले, तर सोलापूरच्या जय जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
हेही वाचा : मुंबई–पुणे प्रवासासाठी नवीन बायपास मार्गास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
गादी विभागातही तितक्याच अटीतटीच्या लढती रंगल्या. ५७ किलो गटात कोल्हापूर शहराच्या अक्षय ढेरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
नाशिक जिल्ह्याच्या शुभम अचपळे यांनी द्वितीय स्थान पटकावले. कोल्हापूर जिल्हा अच्या रोहित पाटील आणि कोल्हापूर जिल्हा बच्या अमोल बोंगार्डे यांनी संयुक्त तृतीय स्थान मिळवले. ६१ किलो गटात कोल्हापूर शहराच्या वैभव पाटील यांनी विजेतेपद पटकावले, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विवेक धावडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सांगलीच्या पांडुरंग माने आणि साताऱ्याच्या आरु खांडेकर यांनी तृतीय स्थानावर मजल मारली.
७९ किलो गटात सोलापूर जिल्हा अच्या विकास करे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. ठाणे जिल्ह्याच्या सुरज माने यांनी द्वितीय, तर पुणे जिल्ह्याच्या निखिल वाडेकर आणि कोल्हापूर शहराच्या पृथ्वीराज बोडके यांनी तृतीय स्थान पटकावले. ८६ किलो गटात कोल्हापूर जिल्ह्याच्या अभिषेक कापडे यांनी विजेतेपद मिळवले. सोलापूर शहराच्या शुभम दुधाळे यांनी द्वितीय स्थान, तर सोलापूर जिल्ह्याच्या शुभम मगर आणि धुळ्याच्या तेजस आपलकर यांनी तृतीय स्थान मिळवले.
रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या मल्लांनी आपले कसब दाखवत स्पर्धेची उंची वाढवली. माती आणि गादी या दोन्ही प्रकारांतील अंतिम फेरीतील लढतींनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेला साजेशा पद्धतीने पार पडलेल्या या स्पर्धेने नवोदित आणि अनुभवी मल्लांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.





