निवडणूक आयोगाकडून अपक्षांसाठी १०१ चिन्हे राखीव

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी ज्यांना तिकिट मिळाले नाही, अशांनी थेट बंडखोरी करीत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. यंदाच्या निवडणुकीत अपक्षांची संख्या मोठी असण्याची शक्यता असून राज्य निवडणूक आयोगाने अपक्षासाठी १९१ इतकी चिन्हे राखीव ठेवली आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, फळे, भाजीपाला आदींचा समावेश आहे.
अपक्ष उमेदवारांसमोर निवडणूक चिन्हे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवणे हे आव्हान असते. दैनंदिन वापराच्या वस्तू ही चिन्हे मतदारांना माहिती असतात.त्यामुळे अशाच चिन्हांना अपक्ष प्राधान्य देतात. टीव्ही, कपाट, रिक्षा, बॅट, लॅपटॉप, फुटबॉल, चावी ,हेडफोन, कंगवा, टेबल, फळा, दुर्बिण आदीं चिन्हांचा त्यात समावेश आहे. याचसह सफरचंद, बिस्कीट, पाव, केक, ढोबळी मिरची, फ्लॉवर, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस, भेंडी, मका, भुईमूग, वाटाणे, पेर, अननस, कलिंगड, अक्रोड, जेवणाची थाळी अशा चिन्हांचाही राखीव चिन्हांत समावेश आहे.
हेही वाचा – टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
अपक्ष उमेदवारांना तसेच मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हांमधून चिन्हाची निवड करता येईल. चिन्ह वाटपाची प्रक्रिया ही आयोगाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पद्धतीने करण्यात येते. मान्यताप्राप्त पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हांवरच उमेदवार उभे करता येतात.
राष्ट्रीय स्तरावरील पाच, राज्यस्तरीय पाच आणि इतर राज्यातील नऊ पक्षांची चिन्हे राखीव आहेत. त्यानंतर अपक्ष उमेदवारांसाठी १९१ मुक्त चिन्हे आहेत. त्यातून प्राधान्यक्रमाने चिन्हांची मागणी अर्जातच करावी लागते. उमेदवारांना ३ जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.




