इस्राईलचे कौन्सिल जनरल कोब्बी शोषानी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान; परराष्ट्र व्यवहार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान

पुणे : इस्राईल आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक सक्षम होण्यात, परराष्ट्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद व ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते शोषानी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, महाव्यवस्थापक रोहित संचेती, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सागर चोरडिया आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना प्रेरक आणि विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्वांचा सन्मान करून त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा असतो.
आपल्यासारख्या महान व्यक्तींचे कार्य विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे असते. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास प्रोत्साहन मिळते. समाजातील दिग्गजांच्या गौरवाचा हा सोहळा सूर्यदत परिवारासाठी अविस्मरणीय क्षण असतो. कोब्बी शोषानी यांनी परराष्ट्र क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या धोरणी आणि मुत्सद्दी कार्यामुळे भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांतील परस्पर सबंध अधिक मजबूत होत आहेत.”
हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याचे सांगून कोब्बी शोषानी म्हणाले, “काटेकोर शिस्त आणि समर्पित वृत्ती ही इस्राईलची ओळख असून, त्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळतेय, याचा मला अभिमान वाटतो. मला भारताविषयी अतीव प्रेम आहे. वर्षागणिक या सुंदर अशा देशाची संस्कृती आणि येथील लोकांविषयी माझ्या मनात आदर, प्रेम व आस्था वाढत आहे. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सूर्यदत्त मोलाचे योगदान देत आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी संस्थेत राबविण्यात येत असलेले उपक्रम महत्वपूर्ण आहेत. ज्ञानाचा मार्ग सहकार्याचा असतो, आणि या ज्ञानमार्गात सहभागी होण्यास मी उत्सुक आहे, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – ‘क्षेत्र कोणतेही असो व्यवस्थापन महत्त्वाचे’; सोनाली कुलकर्णी
रझा मुराद यांनी कोब्बी शोषाणी यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी त्यांचे अमूल्य योगदान आहे. अशा व्यक्तीला सन्मानित करताना मला उपस्थित राहता आल्याचा आनंद आहे. शोषाणी यांचा सन्मान म्हणजे दोन महान राष्ट्रांमधील दृढ संबंध साजरे करण्यासारखे आहे. २०१४ पासून सूर्यदत्त संस्थेशी संबंधित असल्याचा मला खूप अभिमान आहे, आणि मी या नात्याला अजूनही मोठा मान देतो आणि भविष्यात अनेक वर्षे या अद्भुत परंपरेचा भाग होण्याची मला इच्छा आहे, असे रझा मुराद यांनी नमूद केले.
सागर चोरडिया यांनी सांगितले, ‘माननीय कोब्बी शोषाणी यांचे इस्राईलचे कॉन्सुल जनरल म्हणून कार्य अत्यंत आदर्शवत आहे. त्यांची समर्पण आणि राजनैतिक कौशल्ये दीर्घकालिक प्रभाव निर्माण करणारी आहेत, आणि मला विश्वास आहे की हे पुरस्कार त्यांच्याशी संबंधित त्यांच्या प्रयत्नांचे योग्य मान्यता आहे. सर्वांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील होण्याची प्रेरणा देणाऱ्या अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केल्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे अभिनंदन करतो.”
स्नेहल नवलखा यांनी शोषानी यांना सूर्यदत्त संस्थेमध्ये येण्याचे, तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे निमंत्रण दिले. शोषानी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याला संस्थेत येऊन विद्यार्थ्यांशी बोलायला आणि माझे अनुभव शेअर करायला आवडेल, असे आश्वस्त केले.