‘मल्हार’ सर्टिफिकेटवरून वाद! जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्तांचे नितेश राणे यांना पत्र

पुणे : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मांस विक्री संदर्भात केलेल्या घोषणेमुळे नवीन वादाला तोंड फुटले असतानाच जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणे यांना पत्र पाठवून मांस विक्री संदर्भात दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर खंडोबा देवाचे ‘मल्हार’ नाव देवू नका असे पत्र पाठवून मागणी केली आहे.
डॉ. खेडेकर यांनी या पत्रात खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबा देव हा शाकाहारी आहे. देवाला पुरण पोळीचा नैवद्य दाखविला जातो,तर चंपाषष्ठीच्या उपासनेत देवाला वांग्याचे भरीत व रोडग्याचा नैवद्य दाखविला जातो.अशा योजनांना हिंदू देव देवतांचे नाव देणे चुकीचे आहे. मी जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थानचा विश्वस्त असलो तरी विश्वस्त मंडळाची याबाबत भूमिका काय आहे हे मला माहीत नाही,माझी भूमिका ही फक्त नाव बदलण्यात यावी हीच आहे. या योजनेस ‘मल्हार’ सोडून दुसरे नाव द्यावे असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
देवसंस्थान ने पत्रक काढून शासनाच्या निर्णयाचे केले स्वागत. श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी ‘मल्हार’ नावाला विरोध केला असताना देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने मात्र पत्रक काढून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हेही वाचा – पीएमआरडीएची धडक मोहीम : नऊ दिवसात तब्बल दोन हजार अतिक्रमणे जमीनदोस्त
श्री मल्हार म्हणजेच श्री खंडोबाराया हे देश व संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू समाजाचे कुलदैवत आहे. प्रत्येक मल्हार भक्त शुभकार्याची सुरुवात कुलदैवत साक्षीने व स्मरण करून करत असतो.प्रसार माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या मधून असे निदर्शनास आले की हिंदू समाजा द्वारे मांस मटण विक्री संदर्भात ‘मल्हार’ सर्टिफिकेट योजना सुरू करण्यात येत आहे.
या संदर्भात श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळात चर्चा होवून या योजनेला ‘मल्हार’ हे नाव देण्यास कसलाही आक्षेप असण्याचे कारण नाही.उलट या योजनेचे आम्ही स्वागत करत आहोत.ही देवसंस्थानची भूमिका स्पष्ट करीत आहोत असे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रसिध्दी पत्रकावर श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते,विश्वस्त मंगेश घोणे,विश्वास पानसे,पोपट खोमणे,अनिल सौंदडे यांच्या सह्या आहेत.