सवलतीतील एसटी प्रवास आणखी सुकर… महिला सन्मान योजनेंतर्गत १३२ कोटी रुपये

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी)‘महिला सन्मान योजनें’तर्गत विभागाला (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या १३ महिन्यांच्या कालावधीत १३२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एकूण तीन कोटी ३६ लाख महिलांनी निम्म्या दरात प्रवास केल्याची नोंद पुणे एसटी विभागाने केली आहे.
राज्य शासनाने १७ मार्च २०२३ पासून एसटी महामहंडळामध्ये महिलांना ५० टक्के सवलतीमध्ये आराम, निमआराम, शिवशाही, ई-शिवाई बसमधून कोठेही प्रवास अशी महिला सन्मान योजना सुरू केली. जानेवारी तेडिसेंबरपर्यंत (२०२५) तीन कोटी १३ लाख महिलांनी प्रवास केल्याची नोंद एसटी महामंडळाकडे झाली. यातून महामंडळाला १२० कोटी ९५ लाखांचा महसूल मिळाला.
नवीन वर्षातही जानेवारी (२०२६) अखेरपर्यंत २२ लाख ७८ हजार महिलांनी योजनेचा लाभ घेतला. यातून ११ कोटी १७ लाख ७१ हजार उत्पन्न एसटीला मिळाले.तसेच गाड्यांची संख्या कमी असताना देखील पूर्वीची प्रवासी संख्या ओलांडली आहे. पुणे एसटी विभागात २०२४ मध्ये दोन कोटी ५८ लाख ६२ हजार ४२ महिलांनी महिला सन्मान योजनेचा लाभ घेतला, तर योजना सुरू झाल्यापासून डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत चार कोटी ५९ लाख ८३ हजार ८१३ महिलांनी लाभ घेतला आहे.
हेही वाचा – कच्च्या तेलाची सागरी वाहतूक विस्कळीत; महागाईचा धोका
योजनेंतर्गत सर्वाधिक प्रवास ग्रामीण भागातून होत आहे. सोलापूर आणि सातारा हे दोन जिल्ह्यातून महिलांचा प्रवास सर्वाधिक असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, या योजनेमुळे आर्थिक फायदा होत असला, तरी बस अपुऱ्या पडत असून, तातडीने बस वाढविण्याची मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
एसटी संप आणि करोनानंतर एसटी पुणे विभागाची प्रवासी संख्या एक लाखापर्यंत खाली होती. सरकारने प्रवाशांसाठी योजना सुरू केल्यानंतर एसटीकडे प्रवासी संख्या वाढू लागली. ‘महिला सन्मान’योजनेमुळे महिलांसोबत पुरुषांची प्रवासी संख्या वाढली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
राज्य सरकारच्या महिला सन्मान योजनेला पुणे विभागातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांचे नियोजन करून महिला प्रवाशांना प्राधान्य देण्याबाबत चालक, वाहकांना निर्देश देण्यात आले आहे.
– अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे





