निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेला अटक; पुण्यातील एका हॅाटेलमधून घेतले ताब्यात

पुणे : काल रात्री निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले पुणे विमानतळावर दाखल होताच त्याने पुन्हा एकदा गंभीर आरोप केला होता. माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आल्याचा खळबळजनक आरोप कासलेने केला. तसेच विधानसभा निवडणुकीत गप्प बसावे म्हणू दहा लाख रुपये देण्यात आले होते, असे देखील म्हटले होते. त्याच्या नव्या आरोपमुळे एकच खळबळ उडाली होती.
काल रात्री दिल्लीवरुन कासले पुण्यात आल्यानंतर स्वारगेट परिसरातील एका हॅाटेलमध्ये मुक्कामी होता. पुणे पोलिसांना शरण जाऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, बीड पोलिसांनी आज पहाटे त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. सोशल मीडियावर पोलिसांनी कासलेला स्वारगेट परिसरातील एका हॅाटेलमधून ताब्यात घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
रणजीत कासले याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी अॅाफर देण्यात आली होती, असा दावा या व्हिडिओत त्यांनी केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर कासले गायब झाले होते. यानंतर कासले पुणे पोलिसांना शरण जाणार असल्याचे सांगितले होते. ते पुणे विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलाताना गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
हेही वाचा – ‘मिळालेल्या मताधिक्याच्या इतकी एक लाख दहा हजार झाडे लावणार’; आमदार सुनील शेळके
पुणे पोलिसांना शरण जाण्यासाठी मी आलो आहे. १५ दिवस तरी मला कोणी पकडले नसते. पण माझ्या मित्रांशी बोलून मी निर्णय घेतला. बीडला जाऊन मी शरण जाणार आहे. पुणे पोलिसांना तशी मी विनंती केली आहे की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यावर १० लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यातील साडेसात लाख रुपये मी परत केले आहेत. मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दिले होते, असा दावा कासलेने काल रात्री पुणे विमानतळावर माध्यमांशी बोलताना केला होता.
संत बाळूमामा कंस्ट्रक्शन कंपनी ही वाल्मिक कराडच्या मालकीची आहे. या कंपनीत महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या बँक खात्यावर दहा लाख रुपये आले होते. यातले साडे सात लाख रुपये मी परत केले आहेत. उर्वरित पैशातून माझा खर्च चालू आहे. ईव्हीएम मशीनपासून दूर जाण्यासाठी तसेच मी गप्प बसावे म्हणून मला हे दहा लाख रुपये देण्यात आले होते, असा दावा कासले यांनी केला आहे. परळीला माझी ड्यूटी होती. धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत, असे देखील कासले माध्यमांशी बोलताना म्हणाला होता.