रुबी हॉल किडनी रॅकेटप्रकरणी ४७० पानांचा चौकशी अहवाल सादर

पुणे : रुबी हॉल क्लिनिकमध्ये घडलेल्या अवैध किडनी (मूत्रपिंड) रॅकेट प्रकरणी राज्य शासनाने नेमलेल्या १० सदस्यीय चौकशी समितीने सखोल तपास करून ४७० पानांचा अहवाल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सादर केला आहे. या समितीचे नेतृत्व उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. अहवालानुसार किडनीदाता बनावट पत्नी असल्याचे निष्पन्न झाले असून, दोषी कोण हे लवकरच उघड होणार आहे.
शासनाने रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या रॅकेटबाबत सविस्तर चौकशी करण्यासाठी दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ पासून चौकशी सुरू केली होती. अहवालात नमूद आहे की, अमित अण्णासाहेब साळुंखे हा किडनी स्वीकारणारा असून बनावट पत्नी होती, तर सारिका गंगाराम सुतार या किडनीदाता आहेत. तसेच, सारिका गंगाराम सुतार यांची बहीण कविता कोळी यांनी ठरलेली रक्कम न मिळाल्याने हेल्पलाईन क्रमांक १०० द्वारे रुग्णालयाला सूचित करून डिस्चार्ज रोखला होता.
चौकशी समितीने प्रकरणाशी निगडित सर्व घटकांची तपासणी केली. यात शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, रुबी हॉल क्लिनिकचे कर्मचारी, कागदपत्रे तयार करणारे एजंट, किडनीदाता आणि किडनी घेणारा रुग्ण यांचा समावेश होता. तसेच स्टेट ऑथरायझेशन समिती, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा क्र. २ पुणे आणि प्रथमतः चौकशीस मदत करणारे चौकशी अधिकारी यांचाही तपास समितीने केला.
हेही वाचा – प्रभाग ९’ मध्ये परिवर्तनाचा शंखनाद; जनसागराच्या साक्षीनं उमेदवारी अर्ज दाखल!
२४ डिसेंबरला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची बैठक घेऊन चौकशी समितीने अहवाल सादर केला. बैठकीत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे, समिती सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. अहवालातील निष्कर्ष व तपशीलांवर सखोल चर्चा केली गेली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अहवाल प्राप्तीनंतर सांगितले की, पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. अहवालानुसार दोषी कोण आहेत, यावर तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुबी हॉल क्लिनिक प्रकरणी राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील घालमेल, कागदपत्रांतील त्रुटी आणि नियमभंगाचे प्रश्न अधोरेखित झाले आहेत. अहवालाच्या आधारे दोषींविरुद्ध कारवाई केल्यास भविष्यात अशा प्रकारच्या किडनी रॅकेटला आळा बसेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.




