To The Point : भोसरीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरुद्ध खासदार अमोल कोल्हे सभांचा जंगी सामना!
ऐतिहासिक गावजत्रा मैदानात योगी, तर कुदळवाडीत अमोल कोल्हे : ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी महाविकास आघाडीची धावाधाव…!
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भोसरीतील गावजत्रा मैदानावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. त्यानिमित्ताने गेल्या चार दिवसांपासून भाजपा महायुतीकडून जोरदार ब्रँडिंग करण्यात आले. योगींची सभा निर्णायक होईल, या अस्वस्थतेमुळे महाविकास आघाडीकडून चिखली येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सभा नियोजित करण्यात आली. त्यामुळे उद्या रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरुद्ध खासदार अमोल कोल्हे यांच्या सभांचा जंगी सामना पिंपरी-चिंचवडकरांना पहायला मिळणार आहे.
भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी हिंदूत्ववादी नेते आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर ही सभा दि. १७ नोव्हेंबर दुपारी ४ वाजता होणार असून, ही विजयी संकल्प सभा विक्रमी करण्याची तयारी महायुतीच्या समर्थकांकडून केली जात आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे चिखली येथे सभा घेणार आहेत. योगींची सभा झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता ही सभा नियोजित केली आहे. त्यामुळे महायुतीने जी वातावरण निर्मिती केली आहे. त्याचा फटका बसू नये किंबहुना हिंदूत्वाचा मुद्दा चर्चेत येत असल्यामुळे मुस्लिम बहुल परिसरात ही सभा घेण्यात आली असावी, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवत आहेत.
‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी मविआची रणनिती…
दरम्यान, भोसरीतील गावजत्रा मैदानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा झाली. उत्तर पुणे जिल्ह्यात शरद पवार यांनी सभा गाजवल्या किंबहुना महायुतीच्या उमेदवारांना अरक्षश: घाम फोडला आहे. मात्र, भोसरीतील सभेत त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात चकार शब्द काढला नाही. लांडगे यांचा ‘अनुल्लेख’ म्हणजे निवडणुकीत ‘सॉफ्ट कॉर्नर’ असा संदेश मतदार संघामध्ये गेला. तसेच, निष्ठावंत शिवसैनिकांना भोसरीची जागा मिळेल, अशी अपेक्षा असतानाही आम्ही तडजोड केली, असा निर्वाळाही त्यांनी खेडच्या सभेत दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे मनोबल खचले असून, कार्यकर्त्यांचे ‘हौसले बुलंद’ करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांची सभा हितकारी ठरते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
फतवा विरुद्ध भगवा…
काही दिवसांपूर्वी शहरातील विशिष्ट समाजातील लोकांनी एकत्रितपणे प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा दिला आणि फतवा काढला. त्यामुळे मतदार संघातील हिंदू संघटनांनी ‘‘फतवा विरुद्ध भगवा’’ असा नारा दिला आणि हिंदू समाजाची एकजूट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच भाग म्हणून हैद्राबाद येथील भाजपाच्या नेत्या प्रखर हिंदूत्ववादी माधवी लता यांची सभा झाली होती. त्यानंतर आता उत्तरप्रदेशचे जज्ज्वल्य हिंदूत्त्ववादी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. भोसरीतील निवडणूक आता धर्माभिमानाशी जोडली गेली आहे, ही बाब महाविकास आघाडीला परवडणारी नाही, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवत आहेत.





