मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, मोठा अनर्थ टळला

Pankaja Munde | छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे जाणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड आढळल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाच्या निदर्शनास हा दोष आला. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.
पंकजा मुंडे या जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मराठवाडा दौऱ्यावर असून, आज त्यांचा लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रचार सभांचा कार्यक्रम नियोजित होता. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे काही सभांचे वेळापत्रक बदलावे लागले. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणत त्यांनी तात्काळ दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करून पुढील प्रवासाची तयारी केली.
हेही वाचा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २३ हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
या घटनेनंतर सुरक्षेच्या सर्व आवश्यक खबरदाऱ्या घेण्यात आल्या असून, संबंधित हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्या टीमकडून बिघाडाची कारणे शोधण्याचे काम सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि पंकजा मुंडे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
विशेष म्हणजे, कालच छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात झालेल्या प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी सतत हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागत असल्याने आपली आई देव पाण्यात ठेवते, असे भावनिक वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा रंगली आहे.




