..तर सरकारनं मला फाशी द्यावी; बदलापुरातील घटनेनंतर सुप्रिया सुळे आक्रमक

पुणे | बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून लाठीचार्ज करून आंदोलकांना रेल्वे स्थानकातून हटवण्यात आलं. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर पुण्यात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला सरकारनं फाशीची शिक्षा द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने उभे राहणार. आम्ही आंदोलन करणार. जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला व नागरिक सुरक्षित नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या सरकारनं आम्हाला जेलमध्ये टाकावं किंवा फाशी द्यावी.
हेही वाचा – बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा करा; प्रा. कविता आल्हाट
तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना सुरक्षा दिली आहे. मी ऐकलं की आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, अगदी त्या आसामला गेलेल्या सगळ्यांनाही सुरक्षा दिला आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षेची खरंच गरज नाही. मीही तुमच्यासारखीच या राज्याची नागरिक आहे. जेवढी माझी सुरक्षा महत्त्वाची तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक नागरिक व महिलेची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे माझी सुरक्षा काढून घ्यावी आणि ती राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.





