क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार; सिन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

Manikrao Kokate brother Bharat Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे बंधू भारत कोकाटे हे आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
भारत कोकाटे यांनी 2022 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. भारत कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गावाचे सरपंच, तसेच नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन व विशेष कार्यकारी सोसायटी या महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले आहे. भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.
सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर, भाजपने स्थानिक प्रभाव असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्याची रणनीती पुन्हा स्पष्ट केली आहे. भारत कोकाटे यांचा प्रवेश त्याचाच एक भाग मानला जातोय. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिन्नरमध्ये मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंडेड शाखा’; संजय राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांची कन्या सीमांतिनी कोकाटे यांच्याकडे पाहिले जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, या निवडणुकीत त्यांच्या प्रवेशापूर्वीच त्यांच्यासमोर राजकीय अडथळे उभे राहू लागले आहेत. मंत्री कोकाटे यांना यापूर्वीच, विशेषतः गेल्या विधानसभा निवडणुकीत घरातूनच विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या सख्ख्या भावासोबत, म्हणजेच भारत कोकाटे यांच्यासोबत गेले काही वर्ष मतभेद सुरू आहेत, आणि याचा थेट परिणाम कोकाटे कुटुंबाच्या राजकीय प्रवासावर झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांनी थेट मंत्री कोकाटे यांना आव्हान देत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटात सक्रिय सहभाग घेतला आणि तालुक्यात अनेक ठिकाणी मंत्री कोकाटे यांना विरोध केला.
याच संघर्षात, जिल्हा मजूर संघाच्या सिन्नर तालुका गटातून झालेल्या निवडणुकीत, भारत कोकाटे यांनी मंत्री कोकाटे यांच्या उमेदवाराचा एकमताने पराभव घडवून आणला. ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी मंत्री कोकाटे यांच्या पॅनलला थेट आव्हान दिले होते. याशिवाय, विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत मंत्री कोकाटे यांनी सत्तेचा गैरवापर केला, असा आरोपही भारत कोकाटे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर, गेल्या काही काळात मंत्री कोकाटे यांना घरातूनच वाढता राजकीय विरोध सहन करावा लागत आहे. आता भारत कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कोकाटेंना आगामी निवडणुकीत आव्हान निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.




