लिपिक ढेरिंगे याला पुन्हा मूळ विभागात पाठवा…नरहरी झिरवाळ यांचे सामान्य प्रशासन विभागाला पत्र

मुंबई: मंत्रालयातील कार्यालयात लिपिक राजू ढेरिंगे याने ३५ हजार रुपयांची लाच घेतल्याने अडचणीत आलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ढेरिंगे याला पुन्हा त्याच्या मूळ विभागात पाठविण्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागाला लिहिले आहे. ढेरिंगे याच्याविरोधात झालेल्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत झालेल्या कारवाईसंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमुळे निलंबित झालेला औषध दुकानदाराचा परवाना पुन्हा मिळवून देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातच सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले. यासाठी लाचलूचपत प्रतिबंध विभागाला गृह विभागाकडून परवानगी मिळाली होती. अशा वृतीच्या लोकांना कोणही पाठिशी घालणार नाही.
हेही वाचा – मुलुंड अपघातानंतर पहिली मोठी कारवाई, एकनाथ शिंदेंनी दिले निलंबनाचे आदेश
मंत्रालयातील संबंधित लाचखोरी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट करताना मंत्री झिरवाळ यांनी “या प्रकरणाची लिंक जर माझ्यापर्यंत आली, तर मी नक्कीच राजीनामा देईन, असे म्हटले होते. या कारवाईमुळे विरोधकांकडून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. यावर आता स्वत: झिरवाळ यांनी कार्यवाही सुरू केली असून त्यांनी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी आपल्या कार्यालयात राजू ढेरिंगे यांच्याविरोधात झालेल्या कारवाई संदर्भात व्यक्तीश: लक्ष घालून सखोल चौकशी करून गोपनीयरीत्या बंद लिफाफ्यात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना केल्या आहेत.
त्याचप्रमाणे वरळी येथील शिधावाटप कार्यालय क्र. २१ येथील शिधावाटप निरीक्षक राजू संपत ढेरिंगे यांच्यावर लाचखोरीप्रकरणी कारवाई झाल्याने १३ फेब्रुवारीपासून त्यांची सेवा शिधावाटप कार्यालय, वरळी, मुंबई येथे प्रत्यार्पित करण्यात यावी. याविषयीचे योग्य आदेश सत्वर निर्गमित करण्यात यावेत, असे पत्र त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे. यासंदर्भात मंत्री झिरवाळ हे पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबींचा खुलासा करणार आहेत.




