‘राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देणार’; शिंदे गटातील नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी शिखांबाबत वादग्रस्त विधानही केले होते. अमेरिकेतील त्यांच्या वक्तव्यामुळे देशातील राजकीय तापमान वाढले आहे. याचदरम्यान आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
संजय गायकवाड म्हणाले, राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला, असे म्हणत जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार.
हेही वाचा – पद्मश्री ना. धों. महानोर यांनी शेतकरी जीवन मांडले; काशिनाथ नखाते
जेव्हा महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाची मागणी पेटली होती, तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देशात आरक्षण संपवण्याचे विधाने केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट करुन मते घेतली. आज त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. काँग्रेसचा चेहरा अन् मळमळ त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. माझं आव्हान आहे, जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस माझ्या वतीने देईल, असं संजय गायकवाड म्हणाले.





