PCMC: पिंपरी-चिंचवडमध्ये ५ लाख मतदार वाढले!
नवमतदारांमुळे मतदारसंख्येत भर: युवा मतदार ठरविणार भावी नगरसेवक !
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या निवडणुकीकरिता प्रारूप प्रभाग रचना अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाला सादर केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी २०१७ मध्ये ११ लाख ९२ हजार ८९ मतदारसंख्या होती. आठ वर्षात ५ लाख १६ हजार ६९८ मतदार वाढले आहेत. शहरातील लोकसंख्येत झालेली वाढ आणि नवमतदारांमुळे मतदारसंख्येत भर पडल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापौरपदाच्या आरक्षण निश्चितीसाठी शासनाने माहिती मागविली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची तारीख दिवाळीनंतर निश्चित होणार असल्याचे स्पष्ट आहे. निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेऊन सुनावणी पार पडली आहे. आता प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आली असून ६ ऑक्टोबरपर्यंत अंतिम स्वरूप मिळणार आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.
हेही वाचा : राज्यावर 24 ते 29 सप्टेंबरपर्यंत मोठं संकट; 18 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, दसऱ्यापर्यंत पूरस्थितीचा धोका?
कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या [ पिंपरी-चिंचवड ]
राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम अद्याप आलेला नाही. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पालिका निवडणूक विभागाकडून प्रभागनिहाय मतदार यादीचे काम करण्यात येणार आहे.विधानसभेची मतदार यादी फोडून २ १ ते ३२ अशी प्रभागात विभागली जाईल. त्या ३२ मतदार याद्या पालिकेकडून उपलब्ध करण्यात येतील. एका प्रभागात मतदार संख्या ४५ ३ ते ५५ हजार असणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना कसरत होणार आहे.
”निवडणूक आयोगाकडून विधानसभानिहाय मतदारयादी मागविण्यात आली आहे. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर प्रभाग निहाय मतदार याद्या फोडण्यात येतील. मात्र, मतदार यादी कोणत्या तारखेपर्यंत ग्राह्य धरायची, याबाबत सूचना निवडणूक आयोगाकडून आल्या नाहीत.”
अविनाश शिंदे,
सहायक आयुक्त, महापालिका
२०११ च्या जनगणने-नुसार
फेब्रुवारी २०१४ आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली होती. आताच्या निवडणुकीसाठीही २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागरचना करण्यात आली आहे. आताची मतदारसंख्या लक्षात घेऊन मतदारयादी तयार करण्यात येईल.





