EKYCसाठी फक्त ३ दिवस शिल्लक! आदिती तटकरेंचे महत्त्वाचे स्पष्टीकरण

Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा १६ वा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी (eKYC) पूर्ण करणे अनिवार्य आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार ई-केवायसीची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ असून, आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. ई-केवायसी न झाल्यास पुढील हप्ता खात्यात जमा केला जाणार नाही.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर स्पष्टीकरण दिले. वेबसाइटमध्ये सध्या मोठे बदल सुरू असल्याने प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा लाभार्थींसाठी वेबसाइटमध्ये विशेष सुधारणा केल्या जात आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि ई-केवायसी सोपी होईल, असे तटकरे यांनी आश्वासन दिले.
हेही वाचा : ‘मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार’; रमेश चेन्निथला यांची घोषणा
वेबसाइट अपडेट्समुळे काही विलंब होत आहे, पण लवकरच सर्वकाही सुरळीत होईल. पात्र महिलांनी अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावे, जेणेकरून हप्ता वेळेवर मिळेल, असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले.
ई-केवायसी स्टेटस फक्त २ मिनिटांत कसे तपासावे?
लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर (https://ladakibahinyojana.in) जा. मुख्यपृष्ठावर ‘ई-केवायसी’ हा पर्याय दिसेल; त्यावर क्लिक करा. आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरा. आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका. प्रक्रिया पूर्ण झाल्यास ‘ई-केवायसी यशस्वी’ असा संदेश दिसेल. जर प्रक्रिया अपूर्ण असेल, तर पुढील मार्गदर्शन मिळेल.




