मिशन-PCMC : राष्ट्रवादीचा ‘वसंत’ बहरणार की भाजपा पुन्हा रा‘हुल’ देणार?
ग्राऊंड रिपोर्ट: प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपा- राष्ट्रवादीची ‘‘काँटे की टक्कर’’
पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. ऑक्टोबरमध्ये हरकती आणि सूचनांची सुनावणी होईल आणि सदरची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत आणि निवडणूक आचारसंहिता सुरू होईल. डिसेंबरमध्ये मतदान आणि जानेवारी-2026 मध्ये महानगरपालिकेत नवीन महापौर विराजमान होतील. या निमित्ताने ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून प्रभागनिहाय राजकीय स्थितीबाबत विश्लेषण पहिला ‘‘ग्राऊंड रिपोर्ट’’ प्रसिद्ध करीत आहोत. ( भाजपा )
2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग ‘‘रचना जैसे थे’’ आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये कोणताही बदल नाही. ज्याअर्थी 2017 प्रमाणे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यासाठी 2011 ची जनगनना ग्रहीत धरण्यात आली आहे. तत्कालीन जनगननेनुसार, प्रभागाची लोकसंख्या 57 हजार 694 इतकी दर्शवण्यात आली आहे. त्यापैकी 7 हजार 534 इतकी अनुसूचित जाती आणि 822 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 मध्ये या प्रभागामध्ये भाजपाची मोठी लाट होती. या प्रभागातून भाजपाचे चारही उमेदवार निवडून आले होते. अश्विनी जाधव यांनी 8 हजार 334 मतांनी विजय मिळवला. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या रुपाली आल्हाट अवघ्या 48 मतांनी पराभूत झाल्या आहेत. रुपाली आल्हाट आता शिवसेना उबाठा गटाकडून प्रमुख दावेदार आहेत.
भाजपाच्या सारिका बोऱ्हाडे ह्या ब- गटातून 9 हजार 512 मते मिळवत विजयी ठरल्या होत्या. तर, राष्ट्रवादीच्या कविता आल्हाट यांनी ‘घड्याळ’ चिन्हावर 5 हजार 834 आणि शिवसेनेच्या प्रतिभा जाधव यांनी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर 5 हजार 18 मते मिळवली होती.
क- गटातून माजी महापौर राहुल जाधव यांनी 11 हजार 145 मते मिळवली होती. या गटातून शिवसेनेचे अंकुश जाधव यांनी 4 हजार 873 आणि राष्ट्रवादीचे निलेश जाधव यांना 3 हजार 12 मते मिळाली होती. ड- गटातून वसंत बाराटे यांनी भाजपाच्या तिकीटावर 10 हजार 868 मते घेतली होती. त्यांच्या गटात राहुल बनकर यांनी राष्ट्रवादीकडून 5 हजार 549 आणि शिवसेनेचे सचिन ठाकूर यांनी 2 हजार 970 मते मिळवली आहेत. या प्रभागातून मनसेनेही आपला उमेदवार लढवला होता. मनसेचे राहुल जाधव यांनी 1 हजार 118 मते घेतली होती.
भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेले वसंत बोराटे यांनी 2022 मध्ये महापालिका प्रस्तावित निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपाने या ठिकाणी निलेश बोराटे आणि निखिल बोऱ्हाडे यांना मोठी ताकद दिली आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘वसंत’ बहरणार की राष्ट्रवादीला रा‘हुल’ देत भाजपा पुन्हा ‘चौकार’ मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, 2017 च्या आरक्षणानुसार, अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण आणि ड- सर्वसाधारण असे आरक्षण होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला 50 टक्के आरक्षण आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ओबीसी आरक्षण पूर्ववत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लोकसंख्यानुसार आरक्षणामध्ये काही फार बदल होईल, असे चित्र नाही. महिला की पुरूष यावर लॉटरी होईल आणि लढत निश्चित होईल.
आमदार महेश लांडगे यांच्यामुळे मोशीसह भोसरी विधानसभा मतदार संघात मोठ्याप्रमाणात विकासकामे झाली आहेत. समाविष्ट गावांना खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे न्याय मिळाला. त्यामुळे चिखली, मोशी-चऱ्होलीकरांसह पिंपरी-चिंचवडकर भाजपाच्या पाठिशी राहतील.
– राहुल जाधव, माजी महापौर.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे प्रभागात चांगली विकासकामे झाली आहेत. भाजपावर लोकांची नाराजी आहे. पक्षाची ताकद ‘स्ट्राँग’ आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा आम्हाला होईल.
– वसंत बोराटे, राष्ट्रवादी अ.प.







