नगराध्यक्षांना आता नगरसेवकपदही भूषविता येणार; विधान परिषदेत विधेयक मंजूर

Municipal : महाराष्ट्र विधान परिषदेने शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर केले. या विधेयकानुसार नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरींचे थेट निवडून आलेले नगराध्यक्ष आता एकाच वेळी नगरसेवकपदही भूषवू शकणार आहेत. विधानसभेने यापूर्वीच या विधेयकास मंजुरी दिली होती.
राज्य सरकारने डिसेंबर २०२५ मध्ये काढलेल्या अध्यादेशाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी ‘महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२६’ हे विधेयक संमत करण्यात आले. सध्याच्या प्रणालीनुसार नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांकडून केली जाते. या सुधारणेनुसार नगरसेवकपदासाठी पात्र असलेली कोणतीही व्यक्ती नगराध्यक्षपदासाठीही उमेदवारी करू शकेल, तसेच दोन्ही पदांवर एकाचवेळी निवडून येऊन कार्यरत राहू शकेल.
हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन
मात्र विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा व्यक्तीला परिषदेत केवळ एकच मत देता येईल. नगराध्यक्ष म्हणून अथवा नगरसेवक म्हणून. मतांची बरोबरी झाल्यास नगराध्यक्ष निर्णायक मत (कास्टिंग व्होट) देऊ शकतील.
दरम्यान, विधेयकावरील चर्चेत विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे शशिकांत शिंदे यांनी हे विधेयक सत्तेच्या केंद्रीकरणासाठी आणले असून ते लोकशाहीचा गळा घोटणारे असल्याची टीका केली.




