राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप; सुनील तटकरेंचं नाव घेत अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षात सन्मान मिळत नाही आणि अपेक्षित सहकार्यही मिळत नाही, असा आरोप करत आणखी एका प्रदेशाध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे राजीनामे दिले जात असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महानगरपालिका कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गौतम खरात यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. खरात यांनी आपल्या पत्रात स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत, “मी आजवर अत्यंत निष्ठेने पक्षाचे काम केले. मात्र प्रदेश पातळीवरून अपेक्षित मार्गदर्शन किंवा सहकार्य मिळाले नाही,” असे नमूद केले आहे.
तसेच पक्षात केवळ ठराविक लोकांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचाच सन्मान केला जात असून त्यांनाच पदे दिली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अवमान होत असल्याने आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
हेही वाचा – ‘देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अजित पवार यांच्या काळातील राजीनामा नाट्य
या प्रकरणाची सुरुवात 26 जानेवारी रोजी घडलेल्या घटनांपासून झाल्याचे सांगितले जाते. सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन काही सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामे दिले होते. मात्र त्या वेळी अजित पवार यांनी हे राजीनामे स्वीकारण्यास नकार देत संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले होते.
एकामागून एक राजीनामे
राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे राजीनामा सत्र केवळ एका पदाधिकाऱ्यापुरते मर्यादित नाही. गौतम खरात यांच्याआधी राष्ट्रवादी मोटर मालक वाहतूक सेलचे सचिन जाधव, उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालवणी आणि असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
या सर्व नेत्यांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. पक्षात जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्या समीकरणांना महत्त्व दिले जात असल्याची भावना पदाधिकाऱ्यांमध्ये वाढत आहे.





