Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा’

नगरपरिषद निवडणूक : जिल्ह्यातील १७ पैकी १० ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष!

पुणे | पुणे जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे. पुण्याचा कारभारी अजित पवारच! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पडलेल्या या निवडणुकांच्या निकालांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि विशेषतः अजित पवारांचे जिल्ह्यातील नेतृत्व पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कमकुवत होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवडमधील बालेकिल्ला भाजपकडे गेल्यानंतर अजित पवारांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, नगरपरिषद निवडणुकांचे निकाल समोर येताच ही सर्व समीकरणे बदलून गेली आहेत.

पुणे जिल्ह्यातील १७ नगरपरिषदांपैकी तब्बल १० नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून निवडून आले आहेत, तर १ जागा युतीकडे गेली आहे. या निकालांमुळे पुणे जिल्ह्यात अजित पवारांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेना तसेच महाविकास आघाडीला या निकालांनी मोठा धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा       :          आळंदीत भाजपाचा महाविजय; नगराध्यक्षांसह २१ पैकी १५ जागांवर वर्चस्व!

विशेष म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पुण्यात वैयक्तिक लक्ष घातले होते. स्थानिक नेत्यांशी थेट संवाद, कार्यकर्त्यांना बळ देणे आणि स्थानिक प्रश्नांवर केंद्रित रणनीती आखण्याचा फायदा थेट निकालांमध्ये दिसून आला.

महापालिकेतही राष्ट्रवादीची मुसंडी?

नगरपरिषद निवडणुकांतील या यशाचा थेट परिणाम आगामी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांवर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेला आत्मविश्वास आणि संघटनात्मक ताकद पाहता, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेतही जोरदार कमबॅक करू शकते, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

एकंदरीत, हे निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचे न राहता पुणे जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाची दिशा ठरवणारे ठरले आहेत. नुकत्याच राजकारणात आलेल्या नेत्यांच्या ‘दादा’ होण्याच्या स्वप्नांना या निकालांनी जोरदार धक्का दिला असून, पुण्याचा ‘किंग’ अजितदादाच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी हे निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी बळ देणारे ठरणार, यात शंका नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button