“मी डॉक्टर नाही… पण छोटीमोठी ऑपरेशन्स अगदी करून टाकतो,” ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी

महाबळेश्वर : महाबळेश्वरमधील हॉटेल ड्रीमलँड येथे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्सच्या MAPCON 2025 संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशिष्ट शैलीत भाषण करत वातावरण रंगवले. “मी पेशाने डॉक्टर नाही… पण छोटीमोठी राजकीय ऑपरेशन्स अगदी सहज करून टाकतो. महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं मोठं ऑपरेशन मी काही वर्षांपूर्वीच यशस्वी केलं,” असे उद्गार करताच सभागृहात हशा आणि टाळ्यांचा वर्षाव झाला.
डॉ. हिरेमठ यांनी आठ हजार रुग्णांच्या हृदयावरील केलेल्या यशस्वी उपचारांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “तुम्ही हृदय बरे करता… आणि आम्ही कधी कधी लोकांच्या हृदयाचे ठोके चुकवतोही! पण महाराष्ट्राच्या हितासाठी जे लागेल तेच करतो.”
हेही वाचा – पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास मुदतवाढ
कोरोनाच्या काळातील भीषण आठवणी सांगताना शिंदे भावुक झाले. PPE किट घालून रुग्णांना भेटणे, मध्यरात्री ऑक्सिजन संपल्याचे येणारे फोन, राज्यभर उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट—या साऱ्या प्रयत्नांत डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून केलेली सेवा ‘देवदूतां’प्रमाणेच असल्याचे ते म्हणाले. डॉक्टरांच्या तीन दिवसांच्या संमेलनाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले, “डॉक्टरही २४/७ काम करतात. महाबळेश्वरची हवा ही तुमच्यासाठीही औषधच आहे.”
साताऱ्याचे वर्णन करत शिंदे म्हणाले, “सातारचे लोक कंदीपेढ्यासारखे गोड, त्यांच्या हृदयात स्ट्रॉबेरी. मी गावाला आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो.” आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेलीमेडिसिन आणि ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांचा विस्तार या बदलत्या काळातील अत्यावश्यक गोष्टी असून तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात नवे मार्ग खुलते असल्याचे त्यांनी नमूद केले.




