‘१० दिवसांत राजीनामा द्या, अन्यथा तुमचा बाबा सिद्धिकी करू’; योगी आदित्यनाथ यांच्या नावे मुंबईत धमकी

Yogi Adityanath | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून कसून शोध सुरू केला आहे. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनाही या धमकीची माहिती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या नावाने मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून धमकीचा मेसेज आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी येत्या १० दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. नाही तर त्यांनाही बाबा सिद्दिकी सारखे मारू, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. शनिवारी संध्याकाळी हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
हेही वाचा – ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर..’; सुनील तटकरेंचा इशारा

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. आजपासून सर्वच राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. भाजपच्या यादीत योगी आदित्यनाथ यांचं नाव स्टार प्रचारक म्हणून देण्यात आलं आहे. असं असलं तरी योगी आदित्यनाथ हे भाजपसह महायुतीच्या उमेदवारांचाही प्रचार करणार आहेत. मात्र, ही सर्व धामधूम सुरू असतानाच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.





