अहिल्यानगर जिल्ह्यात चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Ahilyanagar Election Observers : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय पक्षांकडून उमेदवार घोषित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग देखील सज्ज झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
नियुक्त निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात भेटी देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोपरगाव , संगमनेर व शिर्डी नगरपरिषदांसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (भा. प्र. से.), तर राहाता, देवळाली प्रवरा व राहुरीसाठी नंदुरबारचे अपर जिल्हाधिकारी पांडुरंग श्रीपती मगदूम निरीक्षक म्हणून कार्य करतील. श्रीरामपूर, शेवगाव व नेवासा क्षेत्रांसाठी जळगावचे अपर जिल्हाधिकारी चांगदेव हारकर, तर पाथर्डी, श्रीगोंदा व जामखेड नगरपरिषदांसाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल (भा. प्र. से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – दिल्ली कार स्फोटातील जीवितहानीबद्दल केंद्रीय मंत्रीमंडळाकडून शोकप्रस्ताव मंजूर….
निवडणूक निरीक्षकांना मतदान केंद्रांची उपलब्धता व सोयी-सुविधा, कर्मचारी व प्रशिक्षणव्यवस्था, स्ट्रॉंग रूम व मतमोजणीची तयारी तसेच विभागांमधील समन्वय यांचा संक्षिप्त आढावा घेण्याचा तसेच आचारसंहिता अंमलबजावणी, खर्च नियंत्रण, पेड न्यूज व सोशल मीडिया निरीक्षण याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.





