‘माझं मत शिंदेंना, शिंदेंचं एकही मत फुटणार नाही’; बच्चू कडू यांचं विधान

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ११ जागांसाठी १२ अर्ज आल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा महायुती की महाविकास आघाडीला पाठिंबा देणार? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
विधान परिषद निवडणुकीबाबत कुणाला पाठिंबा देणार याबाबत बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही गेल्या दोन वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आत्ताही आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. त्यांनी मतदारसंघासाठी भरपूर निधी दिला आहे. मी स्वत: आणि राजकुमार पटेल एकनाथ शिंदेंसोबतच मतदान करणार आहोत. आमचा पाठिंबा त्यांच्या उमेदवारांनाच असेल. एकनाथ शिंदेंचं एकही मत फुटणार नाही. बाकीच्यांचं मला सांगता येणार नाही.
हेही वाचा – पुण्यातील दोन गर्भवतींना ‘झिका’ची लागण; रुग्णसंख्या अठरा
महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर तर शेकापचे जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.





