‘देश तोडणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही कॉंग्रेसची सवय’; अमित शाह यांची टीका

Amit Shah | लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी अमेरिकेत डेलासमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आरएसएस, भाजपा व मोदींना लक्ष केलं होतं. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शाह यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याबाब सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
अमित शाह म्हणाले, देशाविरोधी बोलणं आणि देशाला तोडणाऱ्यांच्या बरोबरीने उभं राहणं ही राहुल गांधी व काँग्रेसची सवयच झाली आहे. मग तो जम्मू-काश्मीरमध्ये जेकेएनसीच्या देशविरोधी व आरक्षणविरोधी अजेंड्याला समर्थन देणं असो किंवा मग विदेशातील व्यासपीठांवर भारताच्या विरोधात बोलणं असो, राहुल गांधींनी देशाची सुरक्षा व भावनांना कायम धक्का पोहोचवला आहे.
हेही वाचा – बेजबाबदार ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करा; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर
https://x.com/AmitShah/status/1833746669843955840
भाषेवरून, प्रांतावरून किंवा धर्मावरून भेदभाव करणाऱ्या गोष्टी बोलणं हे राहुल गांधींच्या फुटीर विचारांचच घोतक आहे. राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विधान करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशाच्या समोर आणण्याचं काम केलं आहे. मनातले विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात, असं अमित शाह म्हणाले.
मी राहुल गांधींना हे सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजपा आहे, आरक्षणाला कुणी हातही लावू शकत नाही. भाजपा आहे तोपर्यंत देशाच्या एकात्मतेशी कुणीही खेळू शकत नाही, असं अमित शाह यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.





