पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर नवा इतिहास; सर्वाधिक काळ सरकार प्रमुख राहण्याचा विक्रम

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ऐतिहासिक कामगिरी करत सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडला. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून एकत्रित कार्यकाळ गाठत मोदी यांनी सरकार प्रमुख म्हणून तब्बल ८,९३१ दिवस पदावर राहण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी चामलिंग यांनी ८,९३० दिवसांचा विक्रम केला होता.
नरेंद्र मोदी हे यापूर्वी गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले असून, मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक अनुभव असलेले ते देशाचे पंतप्रधान ठरले आहेत. तसेच, स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिले पंतप्रधान असल्याची नोंदही त्यांच्या नावावर आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्या पक्षाला विजय मिळवून दिला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकार प्रमुख म्हणून २५ वर्षांचा टप्पा पूर्ण करताना त्यांनी देशवासीयांचे आभार मानले होते. २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासूनच्या प्रवासाचा आढावा घेत त्यांनी लोकांचे जीवनमान उंचावणे आणि राष्ट्रीय प्रगतीत योगदान देणे हा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला असल्याचे सांगितले.
हेही वाचा : अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो; तृप्ती देसाई
मोदी यांनी नमूद केले की, अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी राज्याची धुरा सांभाळली. त्या वेळी गुजरात भूकंप, चक्रीवादळ, दुष्काळ आणि राजकीय अस्थिरतेच्या संकटातून सावरत होते. या आव्हानांनी राज्याची नव्या उमेदीने पुनर्बांधणी करण्याचा निर्धार अधिक बळकट केला.
वैयक्तिक आठवण सांगताना त्यांनी आपल्या आईने दिलेला सल्ला अधोरेखित करत, ‘गरिबांसाठी काम करा आणि कधीही लाच घेऊ नका’, हीच मूल्ये त्यांच्या सार्वजनिक जीवनाला दिशा देणारी ठरली, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, आपल्या कार्यकाळात गुजरातमध्ये कृषी, उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचा उल्लेख करत राज्याने ‘सुशासनाचे केंद्र’ म्हणून ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्याची आठवण करून देत त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या निर्णायक जनादेशाचे श्रेय देशातील जनतेला दिले.





