महाराष्ट्रातील 2 हजार मराठी शाळा बंद पडल्या? मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिले स्पष्टीकरण

Marathi School : राज्यात दोन हजार मराठी शाळा बंद पडल्याच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत आकडेवारीच्या आधारे उत्तर दिले. राज्यातील ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या असून ६९ टक्के विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत, अशी माहिती त्यांनी सादर केली. मराठी शाळा बंद होत असल्याबाबतची माहिती पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचा दावाही त्यांनी केला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी विरोधकांना थेट सवाल केला. दोन हजार मराठी शाळा बंद पडल्याचा आरोप वारंवार केला जातो, पण असा आत्मविश्वास येतो कुठून, असे विचारत त्यांनी या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठी शाळांबाबत केवळ भावना व्यक्त करून उपयोग नसून ठोस कृतीची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा – देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला नंबर! उत्तर प्रदेश आणि कर्नाटक पिछाडीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अभियांत्रिकीसह उच्च शिक्षण आता मातृभाषेत घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवत असतानाच विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञानही आत्मसात करणे तेवढेच आवश्यक असल्याचे नमूद करत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा समतोल शिक्षणात महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




