शहराचे क्षेत्रफळ, लोकसंख्या किती? जनगणनेसाठी प्रशासन सज्ज

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील जनगणनेसाठी महापालिकेने पाच हजार ५०० प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. जनगणना अचूक, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षण मोहिमेंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध केंद्रांवर सत्रे सुरू आहेत. या सत्रांमध्ये जनगणना प्रक्रियेची सखोल माहिती, घरगुती सर्वेक्षण पद्धती, डिजिटल साधनांचा वापर, विदा (डेटा) संकलनातील अचूकता आणि नागरिकांशी प्रभावी संवाद यावर विशेष भर दिला जात आहे.
जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जूनदरम्यान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १८० ते २०० घरांचा एक गट (ब्लॉक) तयार करण्यात येणार आहे. जनगणनेसाठी घरांची यादी तयार केली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती संकलित करून पुढील नियोजनासाठी विदा तयार करण्याचा उद्देश यामागे आहे. त्यानंतरच्या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणनेचे काम हाती घेतले जाणार आहे. यामुळे शहराच्या लोकसंख्येची, तसेच सामाजिक व आर्थिक स्थितीची व्यापक माहिती मिळणार आहे.
हेही वाचा – काम नाही तर पद नाही; एकनाथ शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा
असे आहे पिंपरी-चिंचवड
-एकूण क्षेत्रफळ : १७३.१२ चौरस किलोमीटर
-रहिवासी क्षेत्र : चार हजार ८९३ हेक्टर
-व्यापारी क्षेत्र : ६७२ हेक्टर
-औद्योगिक क्षेत्र : एक हजार ९७६ हेक्टर
-उद्यान, मैदानाचे क्षेत्र : ३७८ हेक्टर
-सार्वजनिक क्षेत्र : ४३० हेक्टर
-वाहतुकीचे क्षेत्र : एक हजार ६७४
-संरक्षण विभागाचे क्षेत्र : नऊ हेक्टर आहे.
-२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या : १७ लाख २७ हजार ६९२
-सध्याची अंदाजित लोकसंख्या : सुमारे ३५ लाख
जनगणना प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रत्यक्ष घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांना सहकार्य करावे. अचूक व योग्य माहिती द्यावी. जनगणनेनंतर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.





