आकुर्डीतील डी वाय पाटील कॉलेज ‘आरडीएक्स’ने उडवण्याची धमकी
एका मेलने उडाली खळबळ : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुरक्षा सतर्कता

पिंपरी-चिंचवड | आकुर्डी येथील डी वाय पाटील कॉलेज परिसरात आरडीएक्स विस्फोटक पेरले असून परिसरात मोठा स्फोट घडवून आणला जाणार असल्याचा मेल महाविद्यालय प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांची आणि कॉलेज प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
आकुर्डी येथे डॉ. डी वाय पाटील संस्थेचे मोठे कॅम्पस आहे. या कॅम्पस मध्ये हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. मंगळवारी (११ मार्च) कॉलेज मध्ये परीक्षा सुरु असताना अचानक प्रशासनाला सकाळी नऊ वाजता एक मेल प्राप्त झाला. त्यामध्ये डी वाय पाटील कॅम्पसमध्ये आरडीएक्स नावाचे विस्फोटक पेरले असून त्याद्वारे कॉलेज उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
हेही वाचा : आता प्रार्थना स्थळावरील भोंग्यावर कारवाई होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डी वाय पाटील कॉलेज प्रशासनाकडून तब्बल तीन तासानंतर दुपारी १२ वाजता पिंपरी-चिंचवड पोलिसांना मेलबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अचानक पोलिसांचा मोठा ताफा कॉलेजमध्ये पोहोचल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण कॉलेज रिकामे करण्याचे आदेश दिले आणि सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून तपासणी सुरू केली. परिसरात तपासणी सुरू असताना अफवांना उधाण आले. त्यामुळे पालकांनीही घाईघाईने कॉलेजकडे धाव घेतली. दरम्यान बॉम्ब शोधक नाशक पथक, श्वान पथक, सायबर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले.
आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सुरुवातीला परीक्षा सुरु असलेल्या ठिकाणचा परिसर पिंजून काढला. तिथे कुठेही विस्फोटक आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण कॅम्पस मध्ये शोधमोहीम राबवली. विस्फोटक नसल्याची खात्री झाल्यानंतर या मेलबाबत तांत्रिक माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. सायबर पोलिसांकडून मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.