मेट्रोमुळे बंद असलेला आयटी पार्कचा रस्ता अखेर खुला

पुणे | हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील टप्पा क्रमांक तीनमधील हेलिपॅड सर्कल ते सेझ सर्कल या रस्त्याची समस्या निर्माण झाली होती. एमआयडीसीने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसाठी हा रस्ता एमआयडीसीकडे हस्तांतरित केला होता. आता मेट्रोचे काम पूर्ण झाल्याने तो रस्ता पूर्ववत करून एमआयडीसीने ताब्यात मागितला. मात्र, केवळ खड्डे बुजवून रस्ता ताब्यात देण्याची भूमिका मेट्रोने घेतली. पीएमआरडीएने अखेर मेट्रोला रस्ता पूर्ववत करण्याचा आदेश दिल्याने समस्या सुटली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम पुणे आयटी सिटी मेट्रो रेल (पुणेरी मेट्रो) कंपनीकडून सुरू आहे. या मेट्रो मार्गासाठी हिंजवडीतील हेलिपॅड सर्कल ते सेझ सर्कल हा रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) जानेवारी २०१९ मध्ये हस्तांतरित केला होता. हा रस्ता ७.०९ किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता पुढे मेट्रो मार्गाच्या कामासाठी पुणेरी मेट्रोच्या ताब्यात देण्यात आला होता. या रस्त्यावरील मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर तो स्वखर्चाने पूर्ववत करून पुन्हा ताब्यात द्यावा, अशी अट त्यावेळी एमआयडीसीने घातली होती.
या रस्त्यावरील मेट्रो मार्गाचे काम संपल्याने तो पुन्हा एमआयडीसीच्या ताब्यात देण्याच्या हालचाली ऑगस्टमध्ये सुरू झाल्या. मेट्रोने या रस्त्यावरील शंभर मीटर लांबीचे काम करून त्याची संयुक्त पाहणी करण्यासाठी एमआयडीसी आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. ही संयुक्त पाहणी ६ ऑगस्टला झाली. त्यावेळी मेट्रोने केवळ खड्डे बुजविल्याचे समोर आले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता पूर्ववत करून देण्याची आग्रही मागणी केली. याला मेट्रोने नकार दिल्याने याबाबत एमआयडीसीने २६ ऑगस्टला पीएमआरडीएला पत्र लिहून रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणी केली.
हेही वाचा : ज्ञानोबा माऊलीचे कार्य सातासमुद्रापार स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात नेणार; मंत्री आशिष शेलार
मेट्रोकडून रस्त्याच्या एकाच मार्गिकेत डांबरीकरण केल्याचा आक्षेप एमआयडीसीने घेतला होता. रस्त्याला पडलेल्या भेगा बुजविणे, पदपथ आणि दुभाजकांची दुरुस्ती व रंगकाम ही कामे करण्यात आली नव्हती. त्यामुळे या रस्त्याचे पूर्ण रुंदीने डांबरीकरण करणे, दुभाजक आणि पदपथांची दुरुस्ती व रंगकाम करून रस्ता ताब्यात द्यावा, अशी मागणी एमआयडीसीने पत्रात केली. यावर पीएमआरडीएकडून मेट्रोला रस्ता पूर्ववत करण्याचेआदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्ववत करून एमआयडीसीकडे सोपविण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.
‘वाहतूक कोंडी कमी होणार’
आयटी पार्कमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यातच मेट्रोच्या कामांमुळे रस्ते व्यापले गेल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती. आता या रस्त्यावरील मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हेलिपॅड सर्कल ते सेझ सर्कल हा रस्ता डांबरीकरण करून पूर्ववत होणार असल्याने येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
मेट्रोसाठी रस्ता घेतानाच तो पूर्ववत करून देण्याची अट होती. त्यानुसार मेट्रोने हा रस्ता एमआयडीसीच्या मागणीप्रमाणे डांबरीकरणासह इतर सुविधांसह पूर्ववत करणे अपेक्षित होते. या प्रकरणी त्यांना आदेश देण्यात आले असून, त्यांच्याकडून लवकरच यावर कार्यवाही होईल.
– डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
मेट्रोच्या कामासाठी आयटी पार्कमधील रस्ता पीएमआरडीएला हस्तांतरित करताना तो पूर्ववत करून देण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार आम्ही भूमिका घेतली होती. याबाबत पीएमआरडीएशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. हा रस्ता पूर्ववत करून देण्याची तयारी मेट्रोने दाखविली आहे.
– कालिदास भांडेकर, मुख्य अभियंता, एमआयडीसी




