राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत तनया पाटील हिचे ”सुवर्णयश”
शिक्षण विश्व : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने गायत्री शाळेच्या नावलौकिकात भर

पिंपरी चिंचवड: गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोशी येथील गुणवंत विद्यार्थिनी तनया दत्ता पाटील हिने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय यशाच्या जोरावर तिची राष्ट्रीय स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही बाब संपूर्ण शाळेसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील नामांकित खेळाडूंशी सामना करत तनयाने उत्कृष्ट डावपेच, संयम, अचूकता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अव्वल कामगिरी सादर केली. सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वास यामुळेच हे सुवर्णयश मिळाल्याचे तिच्या कामगिरीतून स्पष्ट झाले.
तनयाच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवावे, या शाळेच्या ध्येयधोरणांना तिच्या यशामुळे अधिक बळ मिळाले आहे.
हेही वाचा – राम शिंदेंसाठी थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी कायदाच बदलला; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी तनया दत्ता पाटील हिचे विशेष कौतुक करत तिच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि चिकाटीचे मनापासून अभिनंदन केले. राष्ट्रीय स्तरावरही तनया उत्कृष्ट कामगिरी करून शाळा, संस्था व परिसराचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यवस्थापकीय संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि संपूर्ण गायत्री परिवाराच्या वतीनेही तनयाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही तनया आपले कौशल्य सिद्ध करून आणखी एका यशाची भर घालेल, अशी अपेक्षा शाळेने व्यक्त केली आहे.





