प्रतिभा सृजन व्याख्यानमाला 2025 : चिंचवड येथे “चला उभारू नवी पिढी” चा संकल्प
शिक्षण विश्व : पद्मश्री गिरीश प्रभुणे, यजुर्वेंद्र महाजन, संजय आवटे यांची उपस्थिती

पिंपरी-चिंचवड : प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स, चिंचवड, संस्थेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवसांच्या “प्रतिभा सृजन व्याख्यानमाला – 2025” चे आयोजन करत आहे. ही व्याख्यानमाला सात ते नऊ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच ते सात वाजता, प्रतिभा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली जाणार आहे.
या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, विचारवंत, उद्योगपती, कला व साहित्य क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, नवोन्मेषी विचार, सृजनशीलता, व्यावहारिक ज्ञान आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणे या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश आहे.

व्याख्यानमालेत पहिले व्याख्यान दि. 7 डिसेंबर रोजी दीपस्तंभ फाउंडेशन चे संस्थापक संपादक यजुर्वेंद्र महाजन हे “याला जीवन ऐसे नाव” या विषयावर देणार आहेत. दुसरे व्याख्यान दि. 8 डिसेंबर रोजी प्रेरक वक्ता गणेश शिंदे यांचे “विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक व शिक्षकांची भूमिका” या विषयावर असणार आहे. व्याख्यानमालेचा समारोप दि. 9 डिसेंबर रोजी दैनिक लोकमत पुणे चे संपादक संजय आवटे यांच्या “चला उभारू नवी पिढी” या व्याख्यानासह होणार आहे.
हेही वाचा – इंडिगोची तब्बल १७० उड्डाणे रद्द ; हैदराबाद, मुंबई आणि जयपूरसह अनेक विमानतळावर प्रवाशांची गैरसोय

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा होणार गौरव
याच दिवशी प्रतिभा शैक्षणिक संकुलाचा 19 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार असून, या सोहळ्यात ‘प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार 2025’ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार समारंभात पुण्यभूषण फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकापुरते शिक्षण न घेता प्रत्यक्ष जीवनातील कौशल्ये आत्मसात केली तरच ते खऱ्या अर्थाने प्रतिभावान ठरतात. या हेतूने व्याख्यानमाला व पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नक्की लाभ घ्यावा.”





