विद्यार्थ्यांना मिळाला प्रभावी ‘करिअर मंत्र’
शिक्षण विश्व: मोरया शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

पिंपरी चिंचवड : आपल्यामागे आपल्या नावाने एखादी गोष्ट ओळखली जाणे, म्हणजे खरे करिअर घडणे,” असा प्रेरणादायी संदेश प्रा. विजय नवले यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करताना “करिअर मंत्र” सुद्धा सांगितला
मोरया शिक्षण संस्थेच्या वतीने इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करिअर मार्गदर्शन व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. करिअर विषयातील तब्बल वीस वर्षांचा अनुभव आणि आतापर्यंत विविध शाळांमध्ये घेतलेली सुमारे ४००० व्याख्याने यामुळे ओळख असलेले प्रा. विजय नवले हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे अनेक मुद्दे त्यांनी साध्या, प्रभावी आणि सहज समजणाऱ्या भाषेत मांडले.
हेही वाचा – युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
प्रास्ताविकानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रा. नवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत करिअरची संकल्पना अतिशय अनोख्या आणि समर्पक पद्धतीने स्पष्ट केली. “आपल्यामागे आपल्या नावाने एखादी गोष्ट ओळखली जाणे, म्हणजे खरे करिअर घडणे,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांद्वारे विचार करायला लावले. करिअर म्हणजे फक्त नोकरी नव्हे, तर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रवास आहे, हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिले.
विद्यार्थ्यांना मिळाली करिअरची दिशा
दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शाखांची माहिती, प्रवेशप्रक्रियेचे स्वरूप, कोणते पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुले असतात आणि त्यासाठी आवश्यक तयारी कशी करावी याबद्दलही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. भविष्यातील क्षेत्रांची ओळख आत्ताच करून घेणे का महत्त्वाचे आहे, हेही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी म्हणून काही मुद्दे त्यांनी विद्यार्थ्यांकडून पुन्हा उच्चारून घेतले, ज्यामुळे व्याख्यान अधिक सहभागात्मक बनले.




