महिला सक्षमीकरण आणि विकास मॉडेलवर ठाम भर : भीमाताई फुगे
मिशन- PCMC: प्रभाग क्रमांक ५ मध्ये घरोघरी संपर्क, विकासकामांचा आढावा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भोसरी प्रभाग क्रमांक ५ मध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धडाकेबाज सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार श्रीमती भीमाताई पोपटराव फुगे यांनी सलग दुसऱ्या दिवशीही घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात विकासकामांचा आढावा घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
प्रचारादरम्यान नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना फुगे म्हणाल्या, “प्रभागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे हे आमचे प्राधान्य राहिले आहे. रखडलेली कामे पूर्ण करून नियोजनबद्ध विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.”
हेही वाचा – गवळीनगर-चक्रपाणी प्रभागात प्रियांका बारणे यांची प्रचारात आघाडी
२०१७ च्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी पुढील काळात सर्वसमावेशक विकासावर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली. विशेषतः महिलांचा प्रचारातील उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला. बचत गटांच्या महिलांशी संवाद साधताना घरबसल्या रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनांची माहिती देण्यात आली. याला महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत फुगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य सेवा, पेन्शन आणि सार्वजनिक सुविधांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या, तर युवकांनी रोजगारनिर्मिती, खेळाची मैदाने आणि डिजिटल सुविधांवर भर देण्याची मागणी केली. या सर्व बाबी आगामी विकास आराखड्यात समाविष्ट केल्या जातील, असे आश्वासन फुगे यांनी दिले. सलग सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यांमुळे भोसरी प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होत असल्याचे चित्र असून, निवडणुकीची लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“भोसरी प्रभाग क्रमांक ५ मधील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार रस्ते, सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छ परिसर आणि सुरक्षित मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी मी कटिबद्ध आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी घरबसल्या रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करताना युवकांसाठी रोजगार, खेळ व डिजिटल सुविधांवर विशेष भर दिला जाईल. सर्वसामान्यांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सातत्यपूर्ण विकास हाच माझ्या कार्याचा पाया राहील.”
– भीमाताई फुगे, उमेदवार, राष्ट्रवादी.




