श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शन यात्रेस महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
प्रभाग क्रमांक ८ मध्ये भव्य अध्यात्मिक उपक्रम : माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड | भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेश लांडगे यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली, तसेच माजी नगरसेविका नम्रता योगेश लोंढे आणि राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश लोंढे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. ८ – इंद्रायणीनगर आणि परिसरातील महिला भगिनींसाठी श्रावण महिन्याच्या निमित्ताने एक भव्य अध्यात्मिक दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली.
श्रावण महिन्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर महादेव यांचे दर्शन घेणे अत्यंत पुण्यप्रद मानले जाते. याच पार्श्वभूमीवर या यात्रेत प्रभागातील तब्बल २ हजार ५४१ महिला भाविकांनी सहभाग नोंदवला.
यात्रेच्या आयोजनात महिलांच्या सुरक्षितता व सोयींचा विशेष विचार करण्यात आला. आरामदायी ट्रॅव्हल्स बसद्वारे सर्व महिलांची वाहतूक करण्यात आली. सकाळी नाश्ता व चहा, तसेच दुपारचे जेवण अशी उत्कृष्ट जेवण व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण प्रवासात कुठलीही अडचण न येता अतिशय शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात ही यात्रा पार पडली.

हेही वाचा : कुशल मनुष्यबळ जीडीपी वाढीचे गमक; मुदित मित्तल
अध्यात्मिक वातावरण, भाविकांचा आनंद:
श्रावण महिन्याच्या पवित्र वातावरणात भीमाशंकर महादेवाचे दर्शन घेतल्यावर सर्व महिलांनी आध्यात्मिक समाधान व्यक्त केले. भाविक महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे भाव स्पष्ट दिसत होते. अनेक महिलांनी ही यात्रा “आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव” असल्याचे सांगितले. या अध्यात्मिक यात्रेच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आध्यात्मिक बांधिलकीला बळ मिळाले. नम्रता लोंढे यांनी नेहमीच सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांच्या समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. त्यांच्या अध्यात्मिक जाणिवा आणि महिलांसाठी असलेली संवेदना यामुळेच प्रभागातील महिलांना एकत्र येण्याची आणि भक्तिभावाने एकत्रित प्रवास करण्याची संधी मिळाली.
भीमाशंकर दर्शन यात्रेची वैशिष्ट्ये :
- २ हजार ५४१ महिला भाविकांचा सहभाग
- सुरक्षित, आरामदायी ट्रॅव्हल्स वाहतूक
- सकस नाश्ता, चहा व स्वादिष्ट जेवण
- कुशल नियोजन, कुठेही गालबोट न लागलेली यशस्वी यात्रा
- अध्यात्मिक वातावरण आणि भक्तिभावाने ओतप्रोत अनुभव
भीमाशंकर दर्शन यात्रेच्या आयोजनानंतर महिला भगिनींनी समाधान व्यक्त केले आहे. अशा अध्यात्मिक उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या यात्रेच्या माध्यमातून भोसरीतील सामाजिक आणि अध्यात्मिक सौहार्दाचे उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे.”समाजाच्या जडणघडणीत अध्यात्मिक दृष्टिकोन महत्वाचा आहे. महिलांना एकत्र आणून श्रद्धेचा आणि समर्पणाचा अनुभव देणे हीच माझ्यासाठी खरी समाजसेवा आहे.”
– नम्रता लोंढे, माजी नगरसेविका.





