Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अध्यात्मिक विश्व: मावळात नव्या वर्षाची सुरुवात कीर्तन महोत्सवाने!

आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार : विठ्ठल परिवार मावळतर्फे महोत्सवाचे सातवे वर्ष

मावळ: संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळ तालुक्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही भागवत धर्माचा व सांप्रदायाचा गाभा असलेल्या कीर्तन महोत्सवाने होणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीने कामशेत येथील माळरानावर या भव्य दिव्य अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

किर्तन महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. मावळ तालुक्यातील व आजूबाजूच्या तालुक्यामधील लाखो भाविक दरवर्षी या कीर्तन महोत्सवामध्ये सहभागी होत हरी कीर्तन श्रवणाचा आनंद घेत असतात. कामशेत येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत या कीर्तन महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला उत्तम प्रकारे कीर्तनाचा व श्रवणाचा लाभ घेता यावा याकरिता उत्तम प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्यावतीने सुरू आहे.

या कीर्तन महोत्सवामध्ये दैनंदिन उपक्रमात दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये हरिपाठ, सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये श्री विठ्ठल नाम जप, सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेमध्ये हरिकीर्तन, रात्री साडेआठ नंतर सर्वांसाठी महाप्रसाद अशी दैनंदिनी ठेवण्यात आली आहे.

कीर्तन होत्सवामध्ये बुधवारी (1 जानेवारी 2025) सायंकाळी सहा वाजता हभप अंकुर महाराज साखरे यांची कीर्तनरुपी सेवा होणार आहे. गुरुवारी (2 जानेवारी) हभप जयेश महाराज भाग्यवंत, शुक्रवारी (3 जानेवारी) हभप शिवा महाराज बावसकर, शनिवारी (4 जानेवारी) प. पू. आचार्य हभप अमृताश्रम स्वामी महाराज (जोशी बाबा) यांची कीर्तन सेवा होणार आहे. रविवारी (5 जानेवारी) रोजी सकाळी 10 वाजता हभप निवृती महाराज देशमुख (इंदोरिकर) यांची काल्याच्या कीर्तनाची सेवा होणार आहे. रविवारी सकाळी यानिमित्त कामशेत बाजारपेठ ते कीर्तन महोत्सव ठिकाणापर्यंत सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील तमाम नागरिकांनी, माता भगिनी व तरुण तरुणींनी या कीर्तन महोत्सवामध्ये सहभागी होत ज्ञानामृत श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मावळ तालुक्याचे आमदार व श्री विठ्ठल परिवार मावळचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी केले आहे.

Spiritual World The new year begins in Maval with a Kirtan Festival!
Spiritual World The new year begins in Maval with a Kirtan Festival!
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button