‘मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवा’; आयुक्त श्रावण हर्डीकर
आगामी पालिका निवडणुकांच्या तयारीसह दैनंदिन कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा

पिंपरी चिंचवड : आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीनिमित्त शहरातील मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती, निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणुकी, मतदान केंद्रांची सुविधा, अपंगजनांसाठी सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षितता, मतदार यादी अद्ययावत करणे, प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती, प्रारूप मतदार यादीतील बदल आणि मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्याचे तसेच तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सार्वत्रिक निवडणुकीसह महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहायक आयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, शहर अ उपस्थित होते.
हेही वाचा – डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आकुर्डीच्या महिला संघाचा शूटिंगबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक
बैठकीत प्रथम शहरातील दैनंदिन सेवा, स्वच्छता व्यवस्था, खड्डेमुक्ती मोहिम आणि मास्टर प्लॅन अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती आयुक्तांनी मागवली. अवैध होर्डिंग हटविण्याची मोहीम, रस्ते प्रकाशयोजना, जलपुरवठा व ड्रेनेज यंत्रणेची स्थिती याबाबतही सविस्तर चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात प्रशासनाच्या सर्व शाखांकडून अहवाल सादर करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व विभागांनी समन्वय राखत प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या मूलभूत सुविधा आणि सेवांवर अधिक भर देऊन कार्यक्षमता वाढवण्याचे आदेशही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले




