शालेय स्तरावर पथनाट्याद्वारे वसुंधरा जनजागृतीला चालना
‘माझी वसुंधरा ६.०’ अंतर्गत वाकडमध्ये उपक्रम; स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “माझी वसुंधरा ६.०” अभियानांतर्गत वाकड गावठाण परिसरात पथनाट्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व वसुंधरा संवर्धनाची प्रभावी जनजागृती करण्यात आली.
जागतिक हवामान दिनानिमित्त पि. चि. मनपा शाळा, वाकड गावठाण येथे सादर करण्यात आलेले पथनाट्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि वसुंधरा प्रबोधनाचा अनोखा संगम ठरले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहा.आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सहा. आरोग्य अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले आणि आरोग्य निरीक्षक कोमल फर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा – पवना नदी काठावर ‘जागतिक जल दिन’ उत्साहात

उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छता, हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश, हवामान बदलाची कारणे, त्याचे गंभीर परिणाम तसेच दैनंदिन जीवनात करता येणाऱ्या सोप्या उपाययोजनांची माहिती नाट्यरूप सादरीकरणातून देण्यात आली.
स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगताना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे ओला, सुका, घरगुती घातक व सॅनिटरी कचऱ्याचे विलगीकरण तसेच घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता सवयी, कचरा व्यवस्थापनातील सुधारणा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे. लहान वयातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मत सहा. आयुक्त किरणकुमार मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
माझी वसुंधरा ६.० अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. विशेषतः शालेय स्तरावर अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदलाबाबतची जागरूकता निर्माण होत आहे. पथनाट्यासारख्या प्रभावी माध्यमामुळे विद्यार्थी केवळ संदेश आत्मसात करत नाहीत, तर ते आपल्या दैनंदिन जीवनातही त्याची अंमलबजावणी करण्यास प्रेरित होतात. यामुळे भविष्यात पर्यावरणपूरक आणि जबाबदार नागरिक घडण्यास मोठी मदत होणार आहे.
-विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांच्यामध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीबाबतची जाणीव लहान वयातच निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. पथनाट्यासारख्या प्रभावी माध्यमातून दिला जाणारा संदेश त्यांच्या मनावर दीर्घकालीन परिणाम करतो. ‘माझी वसुंधरा’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ जागरूकच होत नाहीत, तर ते आपल्या कुटुंबात आणि समाजातही सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य करतात.
-डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका





