ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची झोपडपट्टी सेवाकर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी!

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल १ कोटी १० लाखांचा विक्रमी सेवाकर वसूल

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल १ कोटी १० लाख ६० हजार ४२१ रुपयांचा झोपडपट्टी सेवाकर वसूल करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांत एका आर्थिक वर्षात वसूल केलेला हा सर्वात जास्त सेवाकर आहे. महापालिकेच्या नियोजनबद्ध वसुली मोहिमेमुळे ही कामगिरी शक्य झाली असून सेवाकर भरणाऱ्या नागरिकांचे महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने यावर्षी सेवाकर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच ऑफलाईन पद्धतीने सेवाकर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

नागरिकांच्या सोयीसाठी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे कार्यालय मार्च २०२६ मध्ये साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले होते. सेवाकर भरणा सुलभ व्हावा आणि नागरिकांची गैरसोय टळावी यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा       :            पिंपरी-चिंचवड मनपाचा महसूल वसुलीत नवा विक्रम

झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने सेवाकर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या या सर्व सुविधांमुळे यंदा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवाकरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १ कोटी १० लाख ६० हजार ४२१ रुपयांचा सेवाकर वसूल झाला आहे.

गेल्या पाच वर्षांतील सर्वात जास्त वसुली

झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २७ लाख ८१ हजार ९०१ रुपयांचा सेवाकर वसूल केला होता. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४५ लाख २४ हजार ४८४ रुपये, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४० लाख ९ हजार ७०५ रुपये व आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४५ लाख ३३ हजार ६९७ रुपयांचा सेवाकर वसूल झाला होता. तर, यंदा म्हणजेच आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सेवाकराच्या माध्यमातून १ कोटी १० लाख ६० हजार ४२१ रुपयांची वसुली झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील सेवाकराच्या माध्यमातून झालेली ही सर्वात जास्त वसुली आहे, अशी माहिती उपायुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

झोपडपट्टी सेवाकर वसुलीत झालेली विक्रमी वसुली ही महापालिकेच्या नियोजनबद्ध धोरणांची आणि नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादाची फलश्रुती आहे. नागरिकांनी वेळेत सेवाकर भरून शहराच्या विकासात दिलेला हातभार अत्यंत महत्त्वाचा आहे.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुलभ सुविधा आणि विशेष वसुली मोहिमा यामुळे यंदा विक्रमी सेवाकर वसुली शक्य झाली. झोपडपट्टीवासीयांनी आपला सेवाकर वेळेत भरून शहराच्या विकासात सहकार्य केले आहे. पुढील काळातही नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा देत महसूल वाढविण्यावर महापालिका भर देणार आहे.

– डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button