Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी – प्राधिकरणातील वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यातील दरोड्याचा पर्दाफाश

राजस्थानपर्यंत १२०० किलोमीटर पाठलाग करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

वॉकी टॉकी वापरून दरोडा टाकणार्‍या सराईत गुन्हेगारासह दोघे जेरबंद

पिंपरी चिंचवड :  निगडी – प्राधिकरणात वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यात घुसून वृद्धाचे हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत सहा लाखाचा ऐवज लुटून नेणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला यश आले आहे. या टोळीतील मुख्य आरोपींचा राजस्थानपर्यंत १२०० किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी त्याला जेरबंद केले. तर, एका आरोपीला तळेगाव येथून ताब्यात घेण्यात आले. गुन्हा केल्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले.

सुरेश लादुराम ढाका (वय २९, रा. दंतीवास, जि. जलौर, राजस्थान) आणि महिपाल रामलाल विष्णोई (वय १९, सध्या रा. वडगाव मावळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. निगडी प्राधिकरणात १९ जुलै रोजी सायंकाळी चंद्रभान अगरवाल (वय ७६) या वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यात घुसून पाच दरोडेखोरांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत हातपाय बांधले आणि घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे
दागिने, महागडी घड्याळे असा तब्बल ६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. जाताना या दरोडेखोरांनी बंगल्यालगतच्या खोलीत राहणार्‍या रखवालदारासह त्याच्या पत्नी व दोन मुलांनाही हातपाय बांधून खोलीत कोंडले. त्यानंतर ते पसार झाले. या दरोड्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने सुमारे १२०० किलोमीटर प्रवास केला. तसेच, २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात राजस्थान येथील जयपूरमधून सुरेश ढाका याला अटक करण्यात आली.

हेही वाचा –  वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘पीएमआरडीए’ आता ‘सिंगल पॉईंट को-ऑर्डिनेटर’!

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोनमोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, महिपाल विष्णोई याला तळेगाव येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्याबांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, महेश खांडे, सोमनाथ मोरे, गणेश कोकणे, नितीन लोखंडे, अमर कदम, विनोद वीर यांच्या पथकाने सहभाग घेतला.

आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

राजस्थान आणि गुजरात राज्यात या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आदी २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीत एक महिला आरोपी आणि इतर तीन आरोपींचा सहभाग असून असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button