प्रभाग क्र. २६ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ; उमेदवारांची आघाडी
मिशन- PCMC : शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्त्वात भाजपाला तगडी ‘फाईट’

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक २६ (पिंपळे निलख–विशालनगर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. पिंपळे निलख, वाकड, कस्पटेवस्ती व विशालनगर परिसरात आयोजित पदयात्रा व जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना उर्फ विठ्ठल काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख–विशालनगर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार तुषार कामठे, संकेत जगताप, सौ. सारिका कस्पटे आणि सौ. सीमा साठे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नागरिकांशी थेट संवाद, घरोघरी भेटी आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे पॅनेलला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व कोकण कृषी विकास प्रतिष्ठान यांच्यात सामंजस्य करार

प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांच्या कौटुंबिक भेटी घेत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली. नागरिकांच्या सहकार्याने आणि विश्वासातूनच प्रभागाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक २६ मध्ये पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर परिसर, अण्णानाऊ सावेनगर, वेलुनगर बाग, रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स आदी परिसरांचा समावेश आहे.
या प्रभागात राष्ट्रवादी शरद पवार पॅनेलचे चारही उमेदवार ‘तुतारी’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तुषार कामठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष असून तेही उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या सुरुवातीलाच मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उमेदवारांनी नागरिकांना भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले.“विकासाचा संकल्प – जनतेसोबत” हा संदेश देत प्रचाराला वेग आला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभाग क्रमांक २६ मधील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा, सुरक्षितता आणि सुविधा या माझ्या प्राधान्यक्रमात असतील. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत पारदर्शक, विकासाभिमुख आणि नागरिकांच्या सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.”
— तुषार कामठे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार).




