पिंपळे सौदागरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोप शिल्पाची उभारणी करा
माजी विरोधी पक्षनेत्यांची मागणी; आयुक्तांना निवेदन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. २८ रहाटणी – पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील छत्रपती युवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप शिल्प उभारण्यात यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.,
याबाबत त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की, पालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत कुणाल आयकॉन रोडवरील छत्रपती युवा चौक रस्ता आधुनिक पद्धतीने विकसित केला जात असून, रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या परिसरात अनेक लहान-मोठ्या खाजगी शाळा, गृहनिर्माण सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापना असल्याने नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. चौकात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन होण्यासाठी आणि सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप शिल्प उभारले जाणे आवश्यक आहे.
हेही वाचा : ‘स्टच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ऐतिहासिक गगनभेदी मानवंदना
महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वी विविध सार्वजनिक उपयोगी प्रकल्प राबविण्यात आले असून, त्याच धर्तीवर पिंपळे सौदागरमधील या महत्त्वपूर्ण चौकाचे शिल्प उभारणीद्वारे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अनेक पिढयांसाठी प्रेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील एक व्यक्तिमत्त्व नव्हते. तर ते एक विचार आहेत. त्यांचे विचार आणि आदर्श काळाच्या पुढे होते. आणि ते पुढील अनेक युगांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारे हे शिल्प नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल त्यामुळे हे शिल्प उभारण्याची मागणी केली आहे.
– नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते, पिंपरी चिंचवड.





